माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा पत्रकार परिषदेत दावा : आरोप बिनबुडाचे
वार्ताहर /केपे
बेतूल पंचायतघराचे काम अडवण्याचा प्रयत्न मी करत आहे असा आरोप स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्ता हे करत असून ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे बिनबुडाचे आरोप करून ते माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी बेतूल पंचायतीचे सरपंच सॅबी फर्नांडिस, उपसरपंच क्लेमेंत फर्नांडिस, तातो केरकर, आकांक्षा नाईक, गुरुदास वेळीप हजर होते.
माझ्या गेल्या 25 वर्षांच्या राजकारणात कधीही दुसऱयांच्या कामाचे श्नेय घेण्याचा प्रयत्न मी केला नाही व कधीही दुसऱयांवर नको असलेले आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलेले आहे की, मी पंचायतघराच्या विषयाचा पाठपुरावा करून हे काम केलेले आहे. सरकार आमचे आहे, पंचायत आमची आहे. मी त्याच पंचायतीत राहतो व मला ते काम झालेले हवे म्हणून मी प्रयत्न केले होते. ते काम मीच का अडवणार, असा सवाल कवळेकर यांनी केला.
मात्र त्या दिवशी कार्यक्रमानंतर स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पंचायतघरासंदर्भात पाहणी करण्याची विनंती केली असता पाहणी करून झाल्यावर जो प्रकार घडला तो अत्यंत निंदाजनक आहे. नवीन आमदाराकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी जी काही कामे केपेत राहिलेली आहेत ती करण्याचा प्रयत्न करावा व त्यांचे श्रेयही घ्यावे. पण नको असलेले आरोप करू नयेत. माझ्या कारकिर्दामध्ये मी कधीच सूड घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे कवळेकर यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांत अनेक कामांचे श्नेय घेण्याचे, टीका करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. पण कधीही त्याला उत्तर द्यायला गेलो नाही. मात्र अशा पद्धतीने अपप्रचार करून लोकांची दिशाभूल करणे हे चुकीचे आहे. नवीन आमदार आहे, त्यांनी लोकांचा विश्वास संपादन करावा, कामे करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याकडे पाच वर्षे आहेत. कोणीही त्यांना कामे करण्यापासून अडविलेले नाही. मी चार वेळा आमदार बनलो, पण कधीही माजी आमदारांच्या विरोधात अपप्रचार केला नाही. जो प्रकार आता होत आहे तो फक्त प्रसिद्धी घेण्याकरिता आहे. केपे मतदारसंघात मी जो विकास केला आहे तो लोकांना माहीत आहे, असे कवळेकर पुढे म्हणाले.