दसरा चौक ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यादरम्यान घटना : परिसरातील सिसीटीव्ही फुटेजवरुन तपास सुरु
प्रतिनिधी/कोल्हापूर
दसरा चौक ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरु होती. तो शाळकरी मुलगा प्रसंगावधान राखून पोलीस स्टेशनमध्ये पळून आला. मात्र असा कोणता प्रकार घडला का याची खातरजमा लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत. परिसरातील व्यापारी तसेच सिसीटीव्हीच्या आधारे असा प्रकार घडला आहे काय याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत अधीक माहिती अशी की, गुरुवारी दुपारच्या सुमारास एक 13 वर्षीय शाळकरी मुलगा दसरा चौकातून लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमार्गे पायी चालत घरी निघाला होता. या मार्गावरील दिपक वडा परिसरात तो आला असता, त्याला आपल्या पाठीमागे एक मोटार असल्याचे जाणवले. त्याला आपले अपहरण होणार असल्याची भिती वाटू लागली. यामुळे तो शाळकरी मुलगा पोलीस स्टेशनच्या दिशेने पळू लागला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाऱयांना त्याने ही माहिती दिली. पोलिसांनी त्याला शांत करुन त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र असा कोणता प्रकार घडला नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. मात्र तरीही खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरु केले आहे. रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरु होता. तो शाळकरी मुलगा भेदरलेल्या अवस्थेत असल्याने शुक्रवारी त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : ग्रामीण थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन तोडणार