नागरिकांच्या सतर्पतेने उधळला कट
टाळसुरे वार्ताहर
दापोली शहरामध्ये गुरांना गुंगीचे औषध देऊन त्यांना चोरून नेण्याचा डाव जागरूक नागरिकांमुळे उधळला आहे. यामुळे दापोलीमधून गुरांना चोरून नेणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न शिवलकर हे आपल्या घरी जात असताना दापोली शहरातील आझाद मैदानानजीक असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर त्यांना एक काळ्या रंगाची झायलो गाडी उभी दिसली. या वाहनाजवळ 4 ते 5 व्यक्ती संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसून येत होते. यावेळी तेथीलच परिसरातील काही तरुणांनाही झायलो गाडीजवळील लोकांचे वागणे वेगळेच वाटत होते. म्हणून सर्वांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी एकत्रित येऊन वाहनाजवळ जायचे ठरवले. तेथे जात असताना संशयास्पद उभी असणाऱ्या व्यक्ती झायलो घेऊन तेथून निघून गेले. यावेळी वाहनाच्या बाजूस 2 गुरे पडून असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून हा प्रकार जनावरे चोरण्याचा असल्याचा तसेच जनावरांना गुंगीचे पदार्थ सेवनास दिल्याचा संशय वाटला म्हणून त्यांनी लगेचच परिसरात संशयित वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्वरेने गुरांची तपासणी करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. या जनावरांची तपासणी व उपचारासाठी नगर पंचायत दापोलीचे संदीप जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस स्थानकातील कर्मचारीही येथे दाखल झाले. पोलीस स्थानकात घडल्या प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
दापोली परिसरात असणाऱ्या भटक्या जनावरांमुळे वाहतूककोंडी होणे, वृद्धांना व लहान मुलांना गुरांचा त्रास होणे, या नित्याच्याच बाबी ठरत आहेत. या गुरांना कोणीही वारस नाही, अशी स्थिती आहे. यामुळेच गुरांची चोरी करणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचे पुढे येत आहे. दापोलीत कोंडवाड्याचा प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे नगर पंचायतीकडूनही या भटक्या गुरांबाबत कोणतीही उपाययोजना आखली जात नसल्याचे पुढे येत आहे.