मजगाव येथील घटनेने खळबळ : देवाचा मुखवटा सुरक्षित
प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव येथील श्री ब्रह्मदेव मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. मंदिरातील दरवाजांना लावलेले कुलूप तोडले तरी चोरटय़ांना गाभाऱयापर्यंत पोहोचता आले नाही म्हणून देवाचा मुखवटा सुरक्षित राहिला आहे.
गुरुवारी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. बुधवारी रात्री मंदिराच्या पुजाऱयांनी मंदिर स्वच्छ करून दरवाजाला कुलूप लावले होते. या परिसरात रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. पहाटे अभिषेकसाठी पुजारी व गावातील वडिलधारी मंदिरात पोहोचले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी वेगवेगळय़ा दरवाजांना लावलेले तीन कुलूप फोडले आहेत. तरीही त्यांना गाभाऱयापर्यंत पोहोचता आले नाही. पहाटे फिरायला घराबाहेर पडलेल्या गावकऱयांना या घटनेची माहिती मिळाली. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
देवस्थान कमिटीचे चेअरमन बी. डी. कुडची, देवाप्पा बांडगी आदी पहाटे फिरायला निघाले होते. मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी गेले असता त्यांना चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजले. गाभाऱयात ब्रह्मदेवाचा चांदीचा मुखवटा होता. चोरटय़ांना तीथपर्यंत पोहोचता आले नाही म्हणून तो सुरक्षित राहिला आहे. चार वर्षांपूर्वी दानपेटी पळविण्यात आली होती. आता पुन्हा श्रावणात चोरीचा प्रयत्न झाला आहे.