Tarun Bharat

तालमींना सोईसुविधा देण्यासाठी विधिमंडळात आ. लंकेंचा आवाज घुमला

फिरोज मुलाणी / औंध :

उदयोन्मुख मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी राज्यातील तालमींना चांगल्या दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय पदके मिळवायची असतील तर शासनाने याबाबत ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी करत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मल्लांच्या प्रश्नाबाबत विधानभवनात आवाज उठवून शासनाचे कुस्ती क्षेत्राकडे लक्ष वेधले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. लंके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे पैलवानांच्या प्रश्नासाठी विधिमंडळात शड्डू ठोकला. उत्तर भारतातील अनेक मल्ल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मल्ल मागे पडत आहेत. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नंतर राज्यातील एक देखील मल्ल ऑलिम्पिकमध्ये पोहचलेला नाही. राज्यात अनेक प्रतिभावंत गुणवंत मल्ल आहेत. मात्र, त्यांना चांगल्या सोईसुविधा उपलब्ध होत नसल्याने कुस्ती सारख्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याची पिछेहाट होत आहे.

नेमक्या याच बाबीवर बोट ठेवून आ. लंके यांनी कुस्ती क्षेत्राबद्दल प्रश्न मांडला. कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक मल्लांना आश्रय दिला. एकेकाळी उत्तर भारत आणि विदेशातील मल्ल सरावासाठी कोल्हापूरला येत होते. दुर्दैवाने सध्या कोल्हापूरच्या तालमीची अतिशय दुरावस्था झाली आहे. मैदानी कुस्तीत अव्वल दर्जाच्या अनेक मल्लांना पराभवाचे पाणी पाजणाऱ्या कोल्हापूर येथील गंगावेश तालमीतील मल्लांनी उत्तर भारतापर्यंत धडक मारली आहे. मात्र याच गंगावेश तालमीतील मल्लांना आज अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शौचालयांची झालेली दुरावस्था तसेच मल्लांना सराव करण्यासाठी साधी मॅटची देखील इथे उपलब्ध नसल्याची बाब आमदार लंके यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याचबरोबर विटा येथे आर्थिक पदरमोड करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील चांगल्या दर्जाचे कुस्ती संकुल उभे केले आहे. अशा कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या मल्लांना शासनाने पाठबळ दिल्यास चांगल्या दर्जाचे मल्ल निश्चित घडतील. यासाठी शासनाने कोल्हापूर आणि राज्यातील इतर तालमींना पायाभूत दर्जाच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी मागणी लंके यांनी शासनाकडे केली. सशक्त आणि दमदार मल्ल घडावेत याकरिता आणि लाल मातीच्या हितासाठी आ. लंके यांनी शासन दरबारी म्हणणे मांडले आहे. पैलवानाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लंके यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकीना आणि पैलवानांनी आमदार लंके यांना धन्यवाद दिले आहेत.

पैलवानांच्या समस्यांची जाणीव असलेले आमदार : हिंदकेसरी संतोषआबा वेताळ

कुस्ती हा अस्सल मर्दानी खेळ आहे. महाराष्ट्रातील कुस्तीला मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा जपण्यासाठी शासनाने देखील सुविधा उपलब्ध करून देणे आणि मल्लांना पाठबळ देणे आवश्यक आहे. मूळचा पिंड पैलवान असलेल्या आमदार निलेश लंके यांनी विधिमंडळात कुस्ती क्षेत्रातील सोईसुविधा बाबत प्रश्न मांडून पैलवानांना न्याय देण्याची घेतलेली भूमिका निश्चित कुस्ती क्षेत्राला उर्जा देणारी ठरेल.

Related Stories

बाप-लेकीची कोरोनाशी झुंज यशस्वी; कृष्णातून चौघांना डिस्चार्ज

Patil_p

”राज्यशासनाकडे कारखाने वाचवण्यास पैसे आहेत, मग पूरग्रस्तांसाठी का नाहीत ?”

Archana Banage

जिल्ह्यात २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Archana Banage

रवी राणांचा ‘मातोश्री’वर जाण्याचा मुहूर्त ठरला

datta jadhav

मग उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?; बावनकुळेंचा सवाल

datta jadhav

कोरोनाचा फटका : शंभरावे नाट्य संमेलन पुढे ढकलले

tarunbharat