Tarun Bharat

काणकोणात ‘इको-टुरिझम’ विकसित करण्याकडे लक्ष देणार

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दौऱयावेळी दिलेली माहिती : ‘अंत्योदय’, ‘स्वदेश दर्शन’ योजना राबविणार

प्रतिनिधी / काणकोण

काणकोण तालुका निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने सर्वांग सुंदर असून देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी पंतप्रधानांच्या अंत्योदय आणि स्वदेश दर्शन या योजनांखाली या तालुक्यात इको-टुरिझम विकसित करण्याकडे लक्ष दिले जाईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले आहे. त्यासाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीने सहकार्य केल्यास स्वदेश दर्शनची सर्व रक्कम या ठिकाणी खर्च करण्याची तयारी खंवटे यांनी दर्शविली. काणकोण मतदारसंघात त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱयाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी मतदारसंघातील नगराध्यक्ष, सरपंच, पंच, नगरसेवक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पर्यटनविषयक समस्या त्यांनी समजून घेतल्या.

काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्या आग्रहावरून श्रीस्थळ येथील सरकारी विश्रामधामात आयोजित केलेल्या या बैठकीला पर्यटन सचिव संजीव ओझा, पर्यटन संचालक निखील देसाई, पर्यटन खात्याचे अन्य प्रमुख अधिकारी, काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर उपस्थित होते. सध्या उर्वरित देशाबरोबरच गोव्यातील पर्यटनाला देखील नवी दिशा मिळत आहे. मात्र काही ठिकाणी गैरव्यवहार चालू आहेत. त्याकडे पर्यटन खात्याचे लक्ष आहे, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

‘होम स्टे’सारख्या योजनेला प्राधान्य दिल्यास महिला सशक्तीकरणाला वाव मिळेल. यात सुसूत्रता व शिस्त आणण्यासाठी पर्यटन खाते आणि स्थानिक लोकांचे संयुक्त गट तयार केले जातील. त्यातून गावातील समस्या गावातच सोडविण्याच्या दृष्टीने लक्ष दिले जाईल. जलक्रीडा, कृषी क्षेत्र, साहसी उपक्रम, गिर्यारोहण याकडे लक्ष देतानाच युवा पिढीला त्याकडे आकर्षित केले जाईल. त्यातून रोजगारनिर्मिती कशी होईल याकडे खात्याचे लक्ष आहे. त्याचबरोबर या सर्व व्यवहारांत एक खिडकी योजना कशी राबविता येईल याकडेही खात्याचे लक्ष आहे, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

मंदिरे, चर्चेसकडे लक्ष द्यावे : तवडकर

काणकोणातील तळपण, पाळोळे, पोळे, आगोंद या किनारपट्टय़ांकडे विशेष लक्ष देतानाच या ठिकाणची मंदिरे, चर्चेस, अभयारण्ये, चापोली व गावणे धरण, कुसके, बामणबुडा येथील धबधबे, बंधारे याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खात्याने खास योजना राबविण्याची गरज सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष रमाकांत गावकर, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, नगरसेवक हेमंत ना. गावकर, माजी नगरसेवक दिवाकर पागी, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, लोलयेचे माजी सरपंच सचिन नाईक, आगोंदच्या फातिमा रॉड्रिग्स, पंच नीलेश पागी, श्रीस्थळचे माजी सरपंच गणेश वेळीप, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, गावडोंगरीचे पंच प्रभाकर गावकर, विशांत गावकर, भाजपाचे सचिव सर्वानंद भगत यांनी काणकोणातील मंदिरांच्या ठिकाणी पर्यटन खात्याने विशेष योजना राबवाव्यात, किनारपट्टीवर चेंजिंग रूम्स, बसायला बाकडे, हायमास्ट दिवे, पार्किंग यांची सोय करावी, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था करावी तसेच पर्यटकांसाठीच्या नौकांच्या पार्किंगची समस्या दूर करावी, अशा सूचना केल्या.

पर्यटन संचालक निखील देसाई यांनी पर्यटन व्यवसायांसंबंधी त्याचबरोबर पर्यटन खाते राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ब्लू फ्लॅग बीच या योजनेखाली देशातील 40 किनाऱयांची निवड झालेली असून या नव्या योजनेत सामील होण्यासाठी 38 प्रकारच्या गोर्ष्टीतून जावे लागणार आहे. या योजनेखाली आलेल्या किनाऱयाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी स्थानिक पंचायत, पालिकेने दक्ष राहायला हवे. याचे निरीक्षण तज्ञ समितीकडून केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आदर्श ग्रामला भेट

त्यानंतर पर्यटनमंत्र्यांनी आमोणे येथील आदर्श ग्रामातील बलराम निवासी शाळा त्याचप्रमाणे आगामी लोकोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. सभापती रमेश तवडकर, बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, आदर्श युवा संघाच्या पदाधिकाऱयांनी यावेळी पर्यटनमंत्र्यांचे स्वागत केले. संध्याकाळच्या सत्रात खंवटे यांनी पैंगीणच्या परशुराम विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन तेथील विद्यार्थी तसेच चालकांशी संवाद साधला. या दौऱयात त्यांनी पैंगीणच्या श्री परशुराम मंदिरालाही भेट दिली. देवस्थानचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर आणि कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांनी पर्यटनमंत्र्यांचे उत्स्फूर्त असे स्वागत केले. आज 11 रोजी पर्यटनमंत्री सकाळी 11 वा. दापट येथील एका जागेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2.30 ते 3 पर्यंत तळपण, पाळोळे, आगोंद किनाऱयांची ते पाहणी करणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने चापोली व गावणे धरण, कुसके व बामणबुडो धबधबे येथे कोणते प्रकल्प राबविणे शक्य आहे यासंदर्भातही ते निरीक्षण करणार आहेत. 

Related Stories

दिवसभरात चार हजार कोरोनामुक्त

Amit Kulkarni

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा डॉ. प्रमोद सावंतच

Tousif Mujawar

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार

Patil_p

उद्यापासून टीका उत्सव-3

Amit Kulkarni

काँग्रेसच्या जनतेप्रती होणाऱया योग्य कार्यामुळेच समाजसेवी कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतात हा गर्वाचा क्षण- प्रियंका गांधी

Amit Kulkarni

सांखळीत महाशिवरात्रीनिमित्त शिक्षकांनी बनविले पर्यावरणप्रिय प्रवेशद्वार

Amit Kulkarni