Tarun Bharat

बाजारात सुक्यामेव्याचे आकर्षण

दिवाळीच्या खरेदीसाठी लगबग : साहित्यांना मागणी वाढली : सुक्मयामेव्याचे गिफ्ट पॅक देण्याची पद्धत होतेय रुढ : वाहन बुकिंगसाठीही गर्दी

प्रतिनिधी / बेळगाव

दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाजारात दिवाळीच्या साहित्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठही विविध साहित्यांनी बहरताना दिसत आहे. दिवाळीत सुक्यामेव्याला मोठी मागणी असते. अलीकडे आकर्षक पॅकिंग आणि इतर गोष्टींमुळे सुकामेवा दिवाळीत आकर्षक ठरू लागला आहे. शिवाय भेट म्हणून सुकामेवा देणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाजारात सुक्यामेव्याला पसंती दिली जात आहे.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होऊ लागले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर यंदाची दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. दिवाळीत आकाश कंदील, दिवे, पणत्या, पूजेचे साहित्य आणि वेगवेगळय़ा मिठाईला मागणी असते. अलीकडे मिठाईबरोबर सुकामेवा खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शारीरिक सुदृढतेसाठी आणि सकस आहार म्हणून सुकामेवा खरेदीला पसंती दिली जाते. त्याबरोबर दिवाळीत त्याची एकमेकांना भेट दिली जाते. फॅक्टरी, कारखाने, दुकाने, व्यापारी, विपेते आदी व्यावसायिकांकडून आपल्या कर्मचाऱयांना भेटीदाखल मिठाई देण्यासाठी सुकामेवा खरेदी केला जात आहे.

   दुकानांमध्ये गर्दीत वाढ

शहरातील सुकामेवा विकणाऱया दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. गणपत गल्ली, अनसुरकर गल्ली, मारुती गल्ली, रविवारपेठ, नरगुंदकर भावे चौक, खडेबाजार आदी ठिकाणी सुक्यामेव्याची खरेदी केली जात आहे. विशेषतः यामध्ये खजूर, काजू, अंजीर, जर्दाळू, पिस्ता, अक्रोड, बदाम, खारीक, मनुका आदींना मागणी वाढत आहे. 

बदाम 740 ते 960 रु. किलो, काजू 700 ते 1000 रु. किलो, पिस्ता 1200 रु. किलो, मनुका 280 ते 360 रु. किलो, खजूर 120 ते 680 रु. किलो, खारीक 240 ते 400 रु. किलो असा दर आहे. दिवाळीच्या अनुषंगाने मागणी वाढली असली तरी दरही वाढले आहेत. त्यामुळे सुकामेवा खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. यंदा किराणा, फराळ, दिवे, पणत्या यांच्या दरात वाढ झाली आहे. त्याबरोबर सुकामेवाही वाढल्याने नागरिकांना यंदाच्या दिवाळीत वाढत्या दराचा चटका सहन करावा लागणार आहे.

विविध आकर्षक स्वरुपात पॅकिंग

दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱया दिवाळीला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे बाजारात खरेदीची रेलचेल पाहायला मिळत आहे. विविध आकर्षक कागद आणि बॉक्समध्ये सुकामेवा पॅकिंग करून दिला जात आहे. दिवाळीत सुक्मयामेव्याचे गिफ्ट पॅक देण्याची पद्धत आता रुढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल याकडे वाढला आहे. गिफ्ट पॅकेट 150 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे भेट म्हणून देण्यासाठी सुक्यामेव्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

दिवाळी यंदा कोरोनामुक्त साजरी होत असल्याने बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. पूजेच्या साहित्यांबरोबर कपडे आणि इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये वर्दळ पाहायला मिळत आहे. दिवाळीत वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे वाहन बुकिंगसाठीही शोरुम्समध्ये नागरिकांची गर्दी होत आहे.

Related Stories

उद्यापासून दसरा सुटीला सुरुवात

Patil_p

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कलंडली गटारीत

Tousif Mujawar

दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

शेतकरी मंडळाने मरगळ झटकून कामे करावीत

Amit Kulkarni

खानापुरात आज अध्यक्ष-उपाध्यक्ष आरक्षणाची लॉटरी

Amit Kulkarni

हुबळी जवळ बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार

mithun mane