रक्षाबंधनासाठी बहिणींकडून खरेदी : राख्यांच्या दरातही काहीशी वाढ
बेळगाव : बहीण-भावाचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेला विविध राख्यांचा बहर चढला आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी राख्यांनी दुकाने सजली आहेत. त्याबरोबर बहिणींचीही राखी खरेदीसाठी वर्दळ वाढू लागली आहे. बाजारात पारंपरिक गोंड्यांच्या राख्यांबरोबर डोरेमॉन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्याही आकर्षण ठरू लागल्या आहेत. त्याबरोबर रेशीम धागे, मोती, रुद्राक्ष खडे अशा सुंदर आणि आकर्षक राख्यांची विक्री होऊ लागली आहे. परगावी राखी पाठवणाऱ्या बहिणींकडून राखी खरेदीला वेग आला आहे. साधारण 5 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत राख्यांचे दर आहेत.
पारंपरिक पद्धतीने सोन्या-चांदीच्या राख्याही खरेदी
काही जण पारंपरिक पद्धतीने सोन्या-चांदीच्या राख्या देखील खरेदी करतात. त्यामुळे सराफ दुकानातून सोन्या-चांदीच्या राख्यांची ऑर्डर देण्यासाठी नागरिक जाऊ लागले आहेत. येत्या सोमवार दि. 19 रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा सण आहे. या पार्श्वभूमीवर विविध राख्यांची खरेदी होऊ लागली आहे. राख्यांच्या दरात देखील यंदा काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे एक-दोन रुपये जादा मोजावे लागत आहेत.