बेळगाव : मुचंडी येथे हनुमान जन्मोत्सव व ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खळय़ाच्या कुस्तीत आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या अतुल शिरोळेने कोल्हापुरच्या संकेतला सहाव्या मिनिटाला धोबीपछाड डावावर चीत करून उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
ग्रामदैवत सिद्धेश्वरच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त मुचंडी येथे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख कुस्ती आंतरराष्ट्रीय पदक विजेता अतुल शिरोळे मुचंडी व संकेत कोल्हापूर ही कुस्ती मुचंडी कुस्तीगिर व पंच कमिटीच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱया मिनिटाला अतुलने दुहेरीपट काढून संकेतला खाली घेतले पण संकेतने त्यातून सुटका करून घेतली. सहाव्या मिनिटाला अतुलने संकेतला पटात घुसल्याचे भासवून सरळ धोबीपछाडवर चित्त करीत संकेतला धक्काच दिला. या विजयानंतर मुचंडी ग्रामस्थांनी अतुलचे कौतुक केले.
या मैदानात अनेक लहान-मोठय़ा चटकदार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस देऊन अतुल शिरोळेचा गौरव करण्यात आला. अतुलने याआधी मॅटवरील कुस्तीवरील कुस्त्यांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदक मिळवून दिले आहे.