प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरांतील बसथांब्यांवरील जाहिरात फलक आणि विविध ठिकाणी असलेल्या होर्डिंग्जवर जाहिराती लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर लिलाव दि. 21 रोजी दुपारी 12 वाजता महापालिका मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
39 बसथांब्यांवरील फलक, 89 जाहिरात फलक आणि महापालिकेच्या जागेवरील 41 जाहिरात फलकांवर जाहिराती लावण्यात येतात. मात्र प्लास्टिक व फ्लेक्स बंदीमुळे मागील काही वर्षात लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात अनधिकृतरित्या जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. परिणामी महापालिकेचा महसूल बुडत
आहे.
जाहिरात फलक शुल्क आकारणीच्या माध्यमातून महापालिकेला 1 कोटी 20 लाखांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.