युद्धादरम्यान याच जॅकेटमध्ये दिसायचे झेलेंस्की : निधीतून युक्रेनला केली जाणार मदत
रशिया-युक्रेन युद्ध दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. सातत्याने होणाऱया बॉम्बवर्षावादरम्यान युक्रेनियन शहरांचा जगासोबतचा संपर्क तुटला आहे. तसेच पायाभूत सुविधांची प्रचंड हानी झाली आहे. याचदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या जॅकेटचा लिलाव झाला आहे. या लिलावातून जमा होणाऱया रकमेतून युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या लोकांना मदत केली जाणार आहे.
लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका चॅरिटी लिलावात झेलेंस्की यांच्या जॅकेटला सुमारे 84 लाख 60 हजार रुपयांची (1 लाख 10 हजार डॉलर्स) किंमत मिळाली. हा लिलाव लंडनमधील युक्रेनच्या दूतावासाने आयोजित केला होता.
जॅकेटची प्रारंभिक किंमत सुमारे 47 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. ज्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लोकांना हे जॅकेट अधिकाधिक किमतीत खरेदी करण्याचे आवाहन केले होते. कीव्हवर पुन्हा कुणी हल्ला करू शकणार नाही आणि युक्रेन नेहमी स्वतंत्र देश राहावा याकरता युक्रेनला समर्थन द्या, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
चिनी मातीने तयार करण्यात आलेला वासिलकीव जग (पाण्याचे भांडे) चाही लिलाव करण्यात आला आहे. कोंबडीच्या आकारातील हा जग कीव्हच्या बोरोडिएंका क्षेत्रात रशियाच्या बॉम्बवर्षावातून वाचला होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे कीव्ह दौऱयावर असताना एका महिलेने त्यांना हे भांडे भेटवस्तू म्हणून प्रदान केले होते.
बॉलचा होणार लिलाव
झेलेंस्की यांची स्वाक्षरी असलेल्या एका बॉलचा ऑनलाईन लिलाव होणार आहे. मेजर लीग बेसबॉलच्या या बॉलवर झेलेंस्की यांनी 2019 मधील न्यूयॉर्क दौऱयादरम्यान स्वाक्षरी केली होती. हा बॉल अत्यंत चांगल्या स्थितीत असून किमान 15 हजार डॉलर्समध्ये म्हणजेच 11 लाख 47 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीत त्याची विक्री होण्याची अपेक्षा आहे. हा लिलाव 11 मेपर्यंत चालणार असल्याचे न्यूयॉर्कच्या आरआर ऑक्शन हाउसकडून सांगण्यात आले.