वृत्तसंस्था/ यंगून
सैन्यशासित म्यानमारच्या एका न्यायालयाने बुधवारी आंग सान सू की यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविले आहे. याचबरोबर त्यांच्या शिक्षेचा कालावधी वाढवून 26 वर्षे करण्यात आला आहे. सू की यांना फेब्रुवारी 2021 मध्ये सत्तापालट घडवून आणल्यावर ताब्यात घेण्यात आले होते. सू की यांना यापूर्वीच भ्रष्टाचार तसेच अनेक गुन्हय़ांसाठी दोषी ठरविण्यात आले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर सू की यांच्या नॅशनल लीग डेमोक्रसी पार्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तर सैन्याने 2023 मध्ये देशात निवडणूक आयोजित करविण्याचे आश्वासन दिले आहे. सू की यांच्या पक्षाने 2020 च्या निवडणुकीत मोठा विजय मिळविला होता, परंतु म्यानमारच्या सैन्याने 1 फेब्रुवारी 2021 मध्म्ये सू की यांच्या निवडून आलेल्या सरकारला बेदखल करत सत्तेची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली होती.