ऑनलाईन टीम/तरुण भारत
Aditya Thackeray Aurangabad News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबाद सिल्लोड(Aurangabad Sillod) येथील सभेला नगरपरिषदेने परवानगी नाकारली आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड शहरातील महावीर चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होणार होती. तर खासदार श्रीकांत (Shrikant Shinde) शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. दरम्यान, नगरपरिषदेने आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली असून खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेला मात्र परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दोन्ही सभा आमने सामने होणार असल्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राउंडवर तर आदित्य ठाकरे यांची सभा महावीर चौकात होणार होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथील सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, त्यांना सभास्थळ बदलण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी होणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरे यांना आता वेगळ्या ठिकाणी सभा घ्यावी लागणार आहे.