प्रतिनिधी / सातारा :
शामगाव ता. कराड घाटात रात्रगस्त घालणाऱ्या उंब्रज पोलीस ठाण्याच्या टीमने धडाकेबाज कारवाई करत औरंगाबाद जिल्ह्यातील रेकॉर्डवरील चंदनचोर टोळीला गजाआड केले असून, त्यांच्याकडून दुचाकी, चंदन चोरीचे शस्त्र व साहित्य असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान सदरच्या टोळीने सातारा व पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चंदन चोरी केली असल्याची कबुली दिली असून १)मजिदखॉ नसीबखॉ गोलवाल (वय २२) रा जंजाळा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद ,२) असिफखॉ नसीबखॉ जौनवाला (वय १९) ,३) उजेरखॉ हुसेनखॉ जौनवाला (१९) दोघे रा. आडगाव माहोली ता. जि. औरंगाबाद अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांना न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात पुष्पा चित्रपटातील पुष्पाची चर्चा सर्वत्र सुरू होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१६ सप्टेंबर रोजी रात्रगस्त करत असताना हेड कॉन्स्टेबल मर्ढेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांना प्राप्त माहितीनुसार एका बजाज मोटरसायकलवर तीन संशयित शामगाव भागात फिरत असून ते रात्री चंदनाची झाडे हेरून कापून आतील चंदनाचे गाभ्याचा चोऱ्या करतात, अशी माहिती मिळाली होती. हेड कॉन्स्टेबल मर्ढेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार व रात्रगस्त टीम शामगाव भागात पेट्रोलिंग करत असताना एक बजाज मोटर सायकल क्रमांक एम एच ११ झेड ५३९७ संशयित ट्रिपल सीट फिरताना मिळून आली.
सदर दुचाकीस थांबवून तपासणी केली असता गाडीवर तीन इसम आपल्या साहित्य बाळगलेल्या स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी तीन संशयितांकडे अधिक चौकशी करून त्यांची झडती घेतली असता मोटर सायकल, दोन करवती, दोन कुऱ्हाडीची पाती असे चंदन चोरीचे साहित्य मिळून आले. अधिक चौकशी केली असता सदर संशित आरोपींनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची शस्त्र ही चंदनाची झाडे तोडून त्यातील चंदन गाभा काढण्यासाठीच बाळगल्याची कबूल दिली तसेच त्या तिघांकडे त्यांचे नाव पत्त्या बाबत खात्री केली असता ते तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी होते. त्यांचा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता त्यांचे विरुद्ध वेदांत नगर एम सिडको उस्मानपुरा मुकुंदवाडी पुंडलिक नगर या पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर त्यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील संशयित आरोपी १)मजिदखॉ नसीबखॉ गोलवाल २) असिफखॉ नसीबखॉ जौनवाला ,३) उजेरखॉ हुसेनखॉ जौनवाला यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.