वृत्तसंस्था/ मॅलागा (स्पेन)
2022 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने तब्बल 19 वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेतील उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला.
ऑस्ट्रेलिया आणि क्रोएशिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात क्रोएशियाच्या बोरीकने ऑस्ट्रेलियाच्या कोकीनेकीचा 6-4, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरने क्रोएशियाच्या अनुभवी मारीन सिलिकचा 6-2, 6-2 असा फडशा पाडत आपल्या संघाला बरोबरीत नेले. त्यानंतर महत्त्वाच्या आणि निर्णायक दुहेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन यांनी क्रोएशियाच्या मेकटीक आणि पेव्हिक यांचा 6-7 (3-7), 7-5, 6-4 असा पराभव करत क्रोएशियाचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी म्हणजे 2003 साली मेलबर्नमध्ये झालेल्या या स्पर्धेत स्पेनचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. क्रोएशियाने यापूर्वी दोनवेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. आता या स्पर्धेत इटली आणि कॅनडा यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार असून या लढतीतील विजयी संघाबरोबर ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना होणार आहे.