Tarun Bharat

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आतापर्यंत तीनवेळा अजिंक्यपद मिळवणाऱया बलाढय़ ऑस्ट्रेलियाने यावेळी सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठली. त्याचप्रमाणे बेल्जियमने न्यूझीलंडचा 2-0 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ऑस्ट्रेलियाने स्पेनचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले.

मंगळवारी येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्पेनचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रामध्ये स्पेनच्या आघडीफळीने ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाला तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण त्याचा त्यांना लाभ उठवता आला नाही. त्यांच्या ब्लेक ग्रोव्हर आणि ओकेनडेन यांना पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवता आला नाही. खेळाच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ खाते उघडू शकले नव्हते. सामन्याच्या दुसऱया सत्राला प्रारंभ झाला आणि स्पेनने 19 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. झेवियर गिस्पर्टने मैदानी गोल नोंदवला. 23 व्या मिनिटाला मार्क रिकेसेन्सने स्पेनचा दुसरा गोल केला. मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना फ्लेन ओगीलिव्हेने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडून स्पेनची आघाडी थोडी कमी केली. मध्यंतरावेळी स्पेनने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. या सामन्यातील तिसऱया सत्रातील सहा मिनिटे बाकी असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सामन्याचे चित्र पालटले. 31 व्या मिनिटाला ऍरेन झेलिवेस्कीने तसेच 32 व्या आणि 36 व्या मिनिटाला जेरेमी हेवर्डने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. 40 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने स्पेनवर 4-2 अशी आघाडी घेतली होती. सामन्यातील तिसऱया सत्रातील कालावधी संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार मिरालेस मार्कने गोल केला. या सामन्यातील 55 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या लॅचेंडला पंचांनी हिरवे कार्ड दाखवले आणि त्यामुळे त्याला दोन मिनिटे मैदानाबाहेर राहावे लागले. या घटनेनंतर स्पेनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाने अखेर हा सामना 4-3 असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.

दुसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमने न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. बेल्जियमतर्फे बून टॉमने दहाव्या मिनिटाला तर व्हॅन फ्लोरेंटने 15 व्या मिनिटाला गोल केले.

सामन्याचे निकाल

ऑस्ट्रेलिया वि. वि. स्पेन 4-3

बेल्जियम वि. वि. न्यूझीलंड 2-0

आजचे उपांत्यपूर्व सामने

इंग्लंड-जर्मनी सायं. 4.30 वा.

हॉलंड-कोरिया सायं. 7 वा.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये सराव, रोनाल्डोला समज

Patil_p

रिषभ पंत, दयानंद गरानी ‘पॉझिटिव्ह’

Amit Kulkarni

श्रीलंकेत भारतीय क्रिकेट संघाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

वक्रदृष्टी टाळण्यासाठी बीसीसीआय सक्रिय

Amit Kulkarni

चेन्नईचा डेव्हॉन ब्रेव्हो आयपीएल हंगामातून बाहेर

Omkar B

टीम इंडियामधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

Tousif Mujawar