वृत्तसंस्था/ राऊरकेला (ओडिशा)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात यजमान भारताने बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विद्यमान विश्वचषक विजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का दिला होता. रविवारच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने शानदार हॅट्ट्रिक साधली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना पहिल्या मिनिटापासूनच आकर्षक होत गेला. दोन्ही संघांनी आक्रमक आणि जलद खेळावर अधिक भर दिला. या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने 2 गोल तर ऑस्ट्रेलियाने 1 गोल केला. कर्णधार हरमनप्रित सिंगने 13 व्या आणि 14 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. तत्पूर्वी म्हणजे दुसऱयाच मिनिटाला जोशुआ बेल्त्झने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले होते. 17 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जुगराज सिंगने या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाचा तिसरा गोल केला. 25 व्या मिनिटाला सेल्वम कार्थीने मैदानी गोल नोंदवून भारताची आघाडी वाढविली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियावर 4-1 अशी मजबूत आघाडी मिळविली होती.
या सामन्यातील खेळाच्या तिसऱया पंधरा मिनिटांच्या सत्रात भारताकडून गोल होऊ शकला नाही. पण या कालावधीत ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा गोल केला. 42 व्या मिनिटाला काय विलॉटने ऑस्ट्रेलियाचा हा मैदानी गोल नोंदविला. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील शेवटच्या आणि चौथ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत 2 गोल केले. 52 व्या मिनिटाला बेन स्टेनिसने तर 56 व्या मिनिटाला ऍरेन झॅलेवेस्कीने गोल नोंदविले. 55 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रित सिंगने संघाचा पाचवा आणि निर्णायक तर वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने चौथे स्थान मिळविले होते तर जर्मनीने जेतेपद पटकाविले होते. प्रो लीग हॉकी स्पर्धेत गेल्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-2 असा फडशा पाडला होता. या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये अनेक वरि÷ खेळाडूंना वगळण्यात आले होते. आकाशदीप सिंग, मनदीप सिंग व निलकांत शर्मा यांना संघातून डच्चू देण्यात आला होता. 2022-23 च्या प्रो लीग हॉकी हंगामातील भारतीय पुरुष हॉकी संघाचा सहा सामन्यातील हा चौथा निर्णायक विजय आहे.