फ्रान्स-अर्जेंटिना सामना 5-5 बरोबरीत
वृत्तसंस्था/ राऊरकेला
येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अ गटातील सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 9-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत आपल्या गटातील अग्रस्थानासह स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील अ गटातील अन्य एका सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला 5-5 असे गोल बरोबरीत रोखले.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना एकतर्फीच झाला. ऑस्ट्रेलियन संघातील आघाडी फळीत खेळणारा अव्वल हॉकीपटू ब्लेक गोव्हर्सने 4 गोल नोंदविले. त्यामध्ये पेनल्टी स्ट्रोकवरील एका गोलाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 24 जानेवारीला भुवनेश्वरमध्ये होणार आहे. मलेशिया आणि स्पेन यांच्यातील क्रॉस ओव्हर सामन्यातील विजयी संघाबरोबर त्यांची गाठ पडेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोव्हर्सने 4 थ्या, 15 व्या, 19 व्या आणि 20 व्या मिनिटाला असे चार गोल केले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 7-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती. गोव्हर्सकडून पहिला आणि चौथा गोल मैदानी ठरला. तर दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर तर तिसरा गोल पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविला गेला. ऑस्ट्रेलियातर्फे टॉम ग्रेगने 10 व्या मिनिटाला, जॅक हार्वेने 22 व्या मिनिटाला, डॅनियल बिलेने 28 व्या मिनिटाला, जेरेमी हेवर्डने 32 व्या मिनिटाला आणि टीम ब्रँडने 47 व्या मिनिटाला गोल नोंदविले. दक्षिण आफ्रिकेतर्फे निटुली निकोबेलीने 8 व्या मिनिटाला तर टेव्हिनने 58 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देत दक्षिण आफ्रिकेला चांगलेच दमविले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 तर दक्षिण आफ्रिकेला 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले.
अ गटातील फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील सामनाही शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार झाला. पण दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 गोल नोंदवित ही लढत बरोबरीत राखली. या गटात आता अर्जेंटिनाचा संघ तीन सामन्यातून 5 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. अर्जेंटिनाने एक सामना जिंकला असून दोन सामने बरोबरीत राखले आहेत. या गटात फ्रान्सचा संघ तिसऱया स्थानावर असून त्यांनी तीन सामन्यातून 4 गुण मिळविले आहेत. फ्रान्सने एक सामना जिंकला असून एक सामना गमाविला तर एक सामना बरोबरीत सोडविला. आता अर्जेंटिनाचा पुढील सामना ब गटातील तिसऱया स्थानावर असलेल्या संघाबरोबर 22 जानेवारीला भुवनेश्वरमध्ये होणार आहे. तर फ्रान्सचा पुढील सामना 23 जानेवारीला खेळविला जाईल.
फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील शुक्रवारच्या सामन्यात 59 व्या मिनिटापर्यंत फ्रान्सने अर्जेंटिनावर 5-4 अशी आघाडी घेतली. शेवटच्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यांच्या व्हिक्टर चार्लेटने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. फ्रान्सचा विजय जवळपास निश्चित झाला असतानाच काही सेकंद बाकी राहिले होते. दरम्यान अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या टोरेने गोल नोंदवित हा सामना अखेरीस 5-5 असा बरोबरीत सोडविला. या सामन्यात अर्जेंटिनाला चार पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. फ्रान्सतर्फे चार्लेटने 36 व्या, 38 व्या, 48 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल केले. यापैकी 2 गोल त्याने पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविले. चार्लेटचे पेनल्टी स्ट्रोकवरील गोल सामन्यातील पहिल्या आणि शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत नोंदविले गेले. फ्रान्सचा पाचवा गोल इटेनीने केला. अर्जेंटिनातर्फे निकोलास टोरेने 34 व्या, 42 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवून हॅट्ट्रिक साधली. अर्जेंटिनाच्या निकोलासने 3 ऱया तर मार्टिन फेरेरोने 51 व्या मिनिटाला गोल केले. आता या स्पर्धेत क आणि ड गटातून नेदरलँड्स आणि इंग्लंड यांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. नेदरलँड्सने क गटात तर इंग्लंडने ड गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
आजचे सामन्यांचे निकाल
ऑस्ट्रेलिया वि. वि. दक्षिण आफ्रिका
9-2
फ्रान्स-अर्जेंटिना सामना अनिर्णित
5-5