अवघ्या 20 चेंडूत 46 धावांची आतषबाजी, दिनेश कार्तिकचा 2 चेंडूत नाबाद 10 धावां
वृत्तसंस्था/ नागपूर
रोहित शर्माने अवघ्या 20 चेंडूत नाबाद 46 धावांची आतषबाजी केल्यानंतर भारताने येथील दुसऱया टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून फडशा पाडला. पावसाने व्यत्यय आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निर्धारित 8 षटकात 5 बाद 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही 7.2 षटकात 4 बाद 92 धावांसह दणकेबाज विजय प्राप्त केला.
शेवटच्या षटकात 9 धावांची आवश्यकता असताना फिनिशर दिनेश कार्तिकने पहिल्याच चेंडूवर वाईड फाईन लेगचा षटकार खेचला तर दुसऱया चेंडूवर स्क्वेअरकडे खणखणीत चौकार वसूल करत सहज विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत तूर्तास 1-1 ने बरोबरी प्राप्त केली.
विजयासाठी 91 धावांचे आव्हान असताना रोहितने टोलेजंग चौकार-षटकारांची मालिकाच सुरु केली. त्याच्या खेळीत 4 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताला 91 धावांचे आव्हान सर करणे अपवाद वगळता केकवॉक ठरले.
रोहितने जोश हॅझलवूडची चौफेर धुलाई करत संघाला अपेक्षित फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला. नंतर पॅट कमिन्सचे गोलंदाजी पृथक्करणही त्याने बिघडून टाकले. ऍडम झाम्पाने 16 धावात 3 बळी घेतल्यानंतरही तो रोहितचे बुलंद इरादे रोखू शकला नाही. प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 8 षटकात 5 बाद 90 धावांपर्यंत मजल मारली. मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 43 धावा फटकावल्या तर ऍरॉन फिंचने 15 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले.
मॅथ्यू वेडने आपल्या डावातील तिन्ही षटकार हर्षल पटेलच्या डावातील शेवटच्या षटकात फटकावले. हर्षलला एकही बळी न घेता 32 धावा मोजाव्या लागल्या. अक्षर पटेलने 13 धावात 2 तर बुमराहने 23 धावात 1 बळी घेतला होता. अडीच तासांचा खेळ वाया गेल्याने हा सामना प्रत्येकी 8 षटकांचा निर्धारित करण्यात आला. उद्या रविवार दि. 25 रोजी उभय संघातील तिसरा व शेवटचा टी-20 सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 8 षटकात 5 बाद 90 (ऍरॉन फिंच 15 चेंडूत 31, मॅथ्यू वेड 20 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 43. अक्षर पटेल 2 षटकात 2-13, बुमराह 2 षटकात 1-23).
भारत ः 7.2 षटकात 4 बाद 92 (रोहित शर्मा 20 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 46, विराट 6 चेंडूत 11, दिनेश कार्तिक 2 चेंडूत नाबाद 10. ऍडम झाम्पा 3-16, कमिन्स 1-23)