आयसीसीकडून वार्षिक क्रमवारी जाहीर, वनडेत न्यूझीलंड अव्वल स्थानी
वृत्तसंस्था/ दुबई
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या टी-20 संघाने अग्रस्थानी राहून 2021-22 या मोसमाची अखेर केली. मात्र कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने अग्रस्थान पटकावत मोसमाची सांगता केली. त्यांच्यापेक्षा 9 गुणांनी पिछाडीवर राहिलेल्या भारताला कसोटीत दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले तर वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने अग्रस्थान पटकावले.
या क्रमवारीसाठी 4 मे पर्यंतच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे. मानांकनाची ताजी क्रमवारीत आयसीसीने बुधवारी जाहीर केली. मागील वर्षी भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अर्धवट राहिली होती. त्यातील उर्वरित एक कसोटी पूर्ण झाल्यानंतर या मालिकेचा मानांकनात समावेश करण्यात येणार आहे. ‘कसोटी सांघिक मानांकनात ऑस्ट्रेलियाने भारतावरील आघाडी एका गुणांवरून 9 मानांकन गुणांवर नेऊन ठेवली आहे तर पाकिस्तानने इंग्लंडला मागे टाकत पाचवे स्थान मिळविले आहे,’ असे आयसीसीने सांगितले. ‘भारतानेही एक गुण मिळवित 119 गुण घेतले आहेत तर इंग्लंडची घसरण झाली असून त्यांना 9 गुण गमवावे लागले आहेत. 2018 मध्ये इंग्लंडने भारतावर 4-1 असा विजय मिळविला होता. पण या मालिकेला आता मानांकनातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडचे 88 मानांकन गुण असून 1995 नंतर त्यांनी मिळविलेले हे सर्वात कमी गुण आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत इंग्लंडवर 4-0 असा विजय मिळविल्यानंतर वार्षिक अपडेटनंतर ते 119 वरून 128 गुणांवर पोहोचले आहेत. 2018-19 मोसम यातून वगळण्यात आला असून मे 2019 नंतरच्या मालिकांचा समावेश करण्यात आला आहे. मे 2021 च्या आधी पूर्ण झालेल्या मालिकांना 50 टक्के तर त्यानंतरच्या मालिकांना 100 टक्के वेटेज देण्यात आले आहे.
टी-20 प्रकारात भारत अव्वल स्थानी राहिले असून दुसऱया स्थानावरील इंग्लंडवर त्यांनी पाच मानांकन गुणांची आघाडी मिळविली आहे. पाक संघ या क्रमवारीत तिसऱया स्थानावर असून दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांनी न्यूझीलंडला मागे टाकले आहे. न्यूझीलंड आता सहाव्या तर विंडीज सातव्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश व लंका हे संघ अफगाणिस्तानपेक्षा पुढे आहेत. अफगाण संघ सध्या दहाव्या स्थानावर आहे.
वनडे मानांकनात न्यूझीलंडने अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र दुसऱया स्थानावरील इंग्लंडवर असणारी त्यांची आघाडी तीनवरून एका गुणावर आली आहे. इंग्लंड व तिसऱया स्थानावरील ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतर सातवरून 17 गुणांपर्यंत वाढले आहे. यात भारत चौथ्या, पाक पाचव्या, द.आफ्रिका सहाव्या, बांगलादेश सातव्या, लंका आठव्या, विंडीज नवव्या, अफगाण दहाव्या स्थानावर आहे.