वृत्तसंस्था/ कोलंबो
ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात यजमान लंकेचा 4 गडय़ांनी पराभव केला. पाच सामन्यांची ही वनडे मालिका लंकेने 3-2 अशा फरकाने जिंकली. लंकेच्या करूणारत्नेची ‘सामनावीर’ तर कुशल मेंडीसची ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या दिवस-रात्रीच्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेचा डाव 43.1 षटकांत 160 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 39.3 षटकांत 6 बाद 164 धावा जमवित विजय नोंदविला
लंकेच्या डावात चमिका करूणारत्नेने 75 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 75, कुशल मेंडीसने 40 चेंडूत 3 चौकारांसह 26, असालेंका एक चौकारांसह 14, मधुसेनने दोन चौकारांसह 15 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचे आठ फलंदाज केवळ 85 धावांत तंबूत परतले. करूणारत्ने आणि मधुसेन यांनी नवव्या गडय़ासाठी 58 धावांची भागिदारी केल्याने लंकेला 160 धावापर्यंत मजल मारता आली. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे हॅजलवूड, कमिन्स, कुनेमन यांनी प्रत्येकी दोन तर मॅक्सवेल आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
उत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात कॅरेने 65 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 45 तर ग्रीनने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 25, वॉर्नरने 2 चौकारांसह 10, मिशेल मार्शने 3 चौकारांसह 24, लाबुसिंघेने 2 चौकारांसह 31, मॅक्सवेलने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे वेलालगेने 42 धावांत , तिक्ष्णाने 26 धावांत 2, मधुसेनने 11 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लंका 43.1 षटकांत सर्वबाद 160 (करूणारत्ने 75, कुशल मेंडीस 26, मधुसेन 15, असालेंका 14, गुणतिलका 8, हॅजलवूड 2-22, कुनेमन 2-26, कमिन्स 2-22, मॅक्सवेल 1-38, ग्रीन 1-13), ऑस्ट्रेलिया 39.3 षटकांत- 6 बाद 164 (वॉर्नर 10, फिंच 0, मार्श 24, इंग्लीस 5, लाबुसिंघे 31, कॅरे नाबाद 45,मॅक्सवेल 16, ग्रीन नाबाद 25, वेलालगे 3-42, तिक्ष्णा 2-26, मधुसेन 1-13).