गोव्हर्सची हॅट्ट्रिक, 7-4 गोलफरकाने भारतावर मात
वृत्तसंस्था/ ऍडलेड
ब्लेक गोव्हर्सने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱया हॉकी कसोटी सामन्यात भारताचा 7-4 अशा गोलफरकाने धुव्वा उडविला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने आघाडीवर राहत संघाचा पहिला गोल नोंदवला. तिसऱया मिनिटाला त्याने पेनल्टीवर हा गोल नोंदवला. पण भारताचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. ऑस्ट्रेलियाने मुसंडी मारत गोव्हर्स व जॅक वेल्च यांनी गोलांचा पाऊस पाडला. शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 5-4 असा विजय मिळविला होता, त्यातील निर्णायक पाचवा गोल गोव्हर्सने नोंदवला होता. त्याने या सामन्यातही जबरदस्त खेळ करीत 12, 27 व 53 व्या मिनिटाला गोल करीत हॅट्ट्रिक नोंदवली तर वेल्चने 17 व 24 व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. याशिवाय जेक व्हेटॉन (48) व जेकब अँडरसन (49) यांनीही एकेक गोल नोंदवले. ऑस्ट्रेलियाने भारतावर मिळविलेला हा सलग 12 वा विजय आहे. भारताचे गोल हार्दिक सिंग (25 वे मिनिट), मोहम्मद राहील (36 व्या मिनिटाला पेनल्टीवर) यांनी केले. हरमनप्रीत सिंगने वैयक्तिक दुसरा गोल 60 व्या मिनिटाला नोंदवला. बुधवारी या दोन संघातील तिसरा सामना होणार आहे.