मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू मिचेल मार्श विवाहबंधनात अडकला आहे. सोमवारी मार्शने त्याची प्रेयसी ग्रेटा मॅकसोबत लग्न केले. दोन वर्षांपूर्वी मार्श आणि ग्रेटाचा साखरपुडा झाला होता. अखेर सोमवारी दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मार्शने सोशल मीडियाद्वारे आपल्या विवाहाची पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, त्याच्या विवाहाची वार्ता समजताच अनेक क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदाच्या आयपीएल हंगामात मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. पण लग्नाच्या कारणास्तव त्याने फ्रँचायझीकडून काही दिवसांची सुट्टी घेतली आणि मायदेशी परतला. सोमवारी ग्रेटा मॅक हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आणि आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. असे असले तरी, आयपीएल हंगाम अर्ध्यात सोडून आलेल्या मार्शला लवकरात लवकर पुढच्या सामन्यांसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये सामील व्हावे लागणार आहे.