प्रतिनिधी /वास्को
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी मंगळवारी गोवा शिपयार्डला सदिच्छा भेट दिली. गोवा शिपयार्डचे मुख्य व्य़वस्थापकीय संचालक टी. एन. सुधाकर यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले. त्यानंतर त्यांना ऑटोनॉमस फास्ट इंटरसेप्टर जहाज प्रकल्पाची माहिती देण्यात आली. भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ऑटोनॉमस क्राफ्टच्या ऑपरेशनची प्रात्यक्षिके त्यांना यावेळी दाखविण्यात आली.
या भेटी दरम्यान, त्यांना विविध जहाजबांधणी, जहाज दुरूस्ती उपक्रम आणि गोवा शिपयार्डमधील तांत्रीक कौशल्याचीही माहिती देण्यात आली. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या आयडीईएक्स योजनेअंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या निवडक संरक्षण स्टार्टअप्सची त्यांना ओळख करून देण्यात आली.