वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ डिसेंबर महिन्यात भारताच्या दौऱयावर येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे. या दौऱयात उभय संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील या मालिकेतील पहिले दोन सामने 9 आणि 11 डिसेंबरला नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. त्यानंतर या मालिकेतील पुढील तीन सामने 14, 17 आणि 20 डिसेंबरला मुंबईतील बेबॉर्न स्टेडियमवर आयोजित केले आहेत. या दौऱयासाठी ऑस्ट्रेलियन संघाची नियमित कर्णधार मेग लेनिंग उपस्थित राहणार नाही. लेनिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर बऱयाच कालावधीसाठी विश्रांतीचा निर्णय घेतला असल्याने ती या दौऱयासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ऍलिसा हिलीकडे सोपविण्यात आले आहे. ऑस्टेलियात 26 नोव्हेंबरला महिलांची बिग बॅश लीग टी-20 स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ भारतात दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियातील या लीग स्पर्धेत भारताच्या पूजा वस्त्रकर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा समावेश होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतीय महिला संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. आता भारतीय महिला क्रिकेट संघ जानेवारीच्या मध्यंतराला होणाऱया तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. या तिरंगी मालिकेत भारत, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांचा समावेश आहे. 10 ते 26 फेबुवारी दरम्यान महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून भारतीय संघाला अधिक सराव मिळावा या हेतूने ही मालिका आयोजित केली आहे.