भारतीय संघावर 3 गडय़ांनी निसटती मात, रेणुका सिंगचा स्वप्नवत स्पेल निष्फळ
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने अवघ्या 18 धावात 4 बळींसह जोरदार सुरुंग लावल्यानंतर देखील ऑस्ट्रेलियन महिला संघाने राष्ट्रकुल सलामी सामन्यात भारतीय महिला संघाला 3 गडी राखून मात दिली. भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 154 धावा फटकावल्या तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 19 षटकात 7 बाद 157 धावांसह विजय संपादन केला.
वास्तविक, 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियासाठी सहजसोपे ठरु शकले असते. पण, आपली केवळ सातवी टी-20 खेळत असलेल्या रेणुका सिंगने 4 षटकात 18 धावात 4 बळी घेत सामन्यात जान आणली. तिच्या भेदक माऱयासमोर एकवेळ तर ऑस्ट्रेलियन संघ 5 बाद 49 असा गडगडला होता. मात्र, नंतर ऍश्ले गार्डनर (35 चेंडूत नाबाद 52) व ऍलाना किंग (नाबाद 18) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करुन दिले. गार्डनरने 37 धावा जमवणाऱया ग्रेस हॅरिससह 51 तर किंगसह अभेद्य 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. भारताच्या डावात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 34 चेंडूत 52, शफाली वर्माने 33 चेंडूत 48, स्मृती मानधनाने 17 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. जेस्स जोनासनने 22 धावांत 4 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ ः 20 षटकात 8 बाद 154 (हरमनप्रीत कौर 34 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 52, शफाली वर्मा 33 चेंडूत 9 चौकारांसह 48, स्मृती मानधना 17 चेंडूत 5 चौकारांसह 24. अवांतर 1. जेस्स जोनास्सन 4 षटकात 4-22, मेगन स्कट 2-26, डॅर्सी ब्राऊन 1-30).
ऑस्ट्रेलियन महिला संघ ः 19 षटकात 7 बाद 157 (ऍश्ले गार्डनर 35 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 52, ग्रेस हॅरिस 20 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 37, ऍलाना किंग 16 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 18. अवांतर 6. रेणुका सिंग 4-18, दीप्ती शर्मा 2-24, मेघना सिंग 1-38).