Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचे विंडीजला 498 धावांचे आव्हान

लाबुशेनचे नाबाद शतक, विंडीज दु. डाव 3 बाद 192

वृत्तसंस्था/ पर्थ

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने विंडीजला निर्णायक विजयासाठी 498 धावांचे कठीण आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात लाबुशेनने नाबाद शतक (104) झळकविले. त्यानंतर विंडीजने दिवसअखेर 3 बाद 192 धावा जमविल्या. विंडीजला विजयासाठी अद्याप 306 धावांची जरुरी असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत. कर्णधार ब्रेथवेटने शानदार शतक झळकविले. ऑस्ट्रेलियाच्या लेयॉनने दक्षिण आफ्रिकेच्या स्टीनचा विक्रम मागे टाकला.

या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 4 बाद 598 धावांवर घोषित केला. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 283 धावात गुंडाळत ऑस्ट्रेलियाने विंडीजवर पहिल्या डावात 315 धावांची बढत मिळविली होती. विंडीजला उपलब्ध असतानाही त्यांनी फॉलोऑन दिला नाही. ऑस्ट्रेलियाने 1 बाद 29 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी आपला दुसरा डाव 2 बाद 182 धावांवर घोषित करून विंडीजला निर्णायक विजयासाठी 498 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात लाबुशेनने 110 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 104 तर वॉर्नरने 71 चेंडूत 5 चौकारांसह 48, स्मिथने नाबाद 20 धावा जमविल्या. विंडीजतर्फे रॉच आणि चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱया डावात नाबाद शतक नोंदविले.

विंडीजने आपल्या दुसऱया डावाला सावध सुरुवात केली. कर्णधार ब्रेथवेट आणि नवोदित चंद्रपॉल यांनी सलामीच्या गडय़ासाठी 116 धावांची शतकी भागीदारी केली. स्टार्कने चंद्रपॉलला त्रिफळाचीत केले. त्याने 126 चेंडूत 4 चौकारांसह 45 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लेयॉनने ब्रुक्सला 11 धावांवर तर ब्लॅकवूडला 24 धावांवर झेलबाद केले. एका बाजूने कर्णधार ब्रेथवेटने चिवट फलंदाजी करत दिवसअखेर 166 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 101 धावा जमविल्या. ब्रेथवेटचे कसोटीतील हे 11 वे शतक आहे. या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱया डावात नाबाद शतक झळकविले. असा पराक्रम करणारा तो कसोटी क्रिकेटमधील आठवा फलंदाज ठरला आहे. विंडीजच्या दुसऱया डावामध्ये लेयॉनने 2 तर स्टार्कने 1 गडी बाद केला.

लेयॉनचा विक्रम

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लेयॉनने विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत नवा विक्रम करताना दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टीनचा 439 बळींचा विक्रम मागे टाकला. लेयॉनने कसोटी क्रिकेटमध्ये आता 440 गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बळी मिळविणाऱया गोलंदाजांच्या यादीत लेयॉन आता नवव्या स्थानावर आहे. या यादीत लंकेचा मुरलीधरन 133 सामन्यात 800 बळी घेत अग्रस्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्न 145 कसोटीत 708 बळी घेत दुसऱया स्थानावर आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन 145 सामन्यातून 708 बळी नोंदवित तिसरे स्थान, भारताचा अनिल कुंबळे 176 सामन्यातून 619 बळी नोंदवित चौथे तर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉडने 159 सामन्यातून 566 बळी मिळवित पाचवे स्थान मिळविले आहे. लेयॉनला भारताच्या रविंचंद्रन अश्विनचा विक्रम मागे टाकण्यासाठी आणखी तीन बळींची जरुरी आहे. 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱया बांगलादेश आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विन खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया प. डाव 152.4 षटकात 4 बाद 598 (डाव घोषित), विंडीज प. डाव 98.2 षटकात सर्वबाद 283, ऑस्ट्रेलिया दु. डाव 37 षटकात 2 बाद 182 (डाव घोषित), (लाबुशेन नाबाद 104, वॉर्नर 48, स्मिथ नाबाद 20, रॉच 1-30, चेस 1-31), विंडीज दु. डाव 62 षटकात 3 बाद 192 (पेग बेथवेट खेळत आहे 101, चंद्रपॉल 45, ब्रुक्स 11, ब्लॅकवूड 24, लेयॉन 2 बळी, स्टार्क 1 बळी).

Related Stories

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

‘सूर्य’ तळपला, मुंबई इंडियन्स जिंकली!

Omkar B

हैदराबाद हंटर्सचा मुंबईवर विजय, सिंधूची चमक

Patil_p

आजाराला कंटाळून कोल्हापूरच्या कबड्डी पट्टू युवतीची आत्महत्या

Abhijeet Khandekar

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून

Omkar B

अमेरिका, पोलंड, ग्रीस, इटली उपांत्यफेरीत

Amit Kulkarni