Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचा 511 धावांचा डोंगर

लाबुशेन, हेड यांची दीडशतके, विंडीज प. डाव 4 बाद 102

वृत्तसंस्था/ ऍडलेड

येथे सुरू झालेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने आपली सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 511 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजची स्थिती 4 बाद 102 अशी केविलवाणी झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेन आणि हेड यांनी शानदार दीडशतके झळकविली. ही दुसरी कसोटी दिवस-रात्रीची प्रकाशझोतामध्ये खेळविली जात आहे.

उभय संघातील झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजचा पराभव करून मालिकेत आघाडी यापूर्वीच घेतली आहे. आता ऑस्ट्रेलियन संघ विंडीजचा व्हाईट वॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 3 बाद 330 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 7 बाद 511 धावांवर डावाची घोषणा केली. लाबुशेन आणि हेड या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 297 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने 305 चेंडूत 14 चौकारांसह 163 तर हेडने 219 चेंडूत 20 चौकारांसह 175 धावा झळकविल्या. उस्मान ख्वाजाने 9 चौकारांसह 62, कॅरेने 6 चौकारांसह नाबाद 41 धावा आणि वॉर्नरने 21 धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे जोसेफने तसेच थॉमसने प्रत्येकी 2, होल्डर आणि ब्रेथवेट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा जलद टप्पा ओलांडणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचे दिवंगत सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी यापूर्वी हा पराक्रम केला होता. लाबुशेनने 51 डावात 3 हजार धावा पार केल्या आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लाबुशेनने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱया डावात शतक झळकविले होते. या मालिकेतील त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. हेडचे पहिल्या सामन्यातील शतक केवळ एका धावेने हुकले होते. मात्र, त्याने या दुसऱया कसोटीत 175 धावांची खेळी केली.

विंडीजने दुसऱया दिवसाअखेर 37 षटकात 4 बाद 102 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी पदार्पण करणाऱया नेसरने 20 धावात 2 तर लेयॉन आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ब्रेथवेटने 2 चौकारांसह 19, ब्रुक्सने 8, ब्लॅकवूडने 3 तर थॉमसने 2 चौकारांसह 19 धावा जमविल्या. सलामीचा चंद्रपॉल 1 षटकार आणि 3 चौकारांसह 47 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियातर्फे नेसरने 20 धावात 2 तर लेयॉन आणि ग्रीन आणि प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजचा संघ अद्याप 409 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे पहिल्या डावात 6 गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती अधिक भक्कम झाली असून आता ते विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया प. डाव 137 षटकात 7 बाद 511 (डाव घोषित) (लाबुशेन 163, हेड 175, ख्वाजा 62, वॉर्नर 21, कॅरे नाबाद 41, नेसर 18, जोसेफ 2-107, थॉमस 2-53, होल्डर 1-68, ब्रेथवेट 1-35). विंडीज प. डाव 37 षटकात 4 बाद 102 (ब्रेथवेट 19, चंद्रपॉल खेळत आहे 47, ब्रुक्स 8, ब्लॅकवूड 3, थॉमस 19, नेसर 2-20, लेयॉन 1-13, ग्रीन 1-23).

Related Stories

पाकचा सातवा क्रिकेटपटू कोरोनाबाधित

Patil_p

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Archana Banage

हजारो मुलांना क्रिकेटचे ऑनलाईन प्रशिक्षण

Patil_p

सचिन, लाराने लुटला गोल्फचा आस्वाद

Patil_p

भारतीय मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी राणा

Patil_p

अंतिम फेरी गाठत अन्शू मलिकचा नवा इतिहास

Amit Kulkarni