बेथ मुनी, अॅलिसा हिली यांची नाबाद अर्धशतके
वृत्तसंस्था/ गिक्वेबेरा (दक्षिण आफ्रिका)
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या गट 1 मधील सामन्यात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना लंकेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि ‘सामनावीर’ अॅलिसा हिली यांनी नाबाद अर्धशतके झळकविली. बेथ मुनीला पुन्हा सूर मिळाल्याने ऑस्ट्रेलियन गोटात समाधान व्dयाक्त केले जात आहे.
ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत गट 1 मधून आतापर्यंत आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकत 6 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे. या गटात लंका दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 3 सामन्यातून चार गुण नोंदवताना दोन विजय नोंदवले आहेत. गुरुवारच्या सामन्यात बलाढ्या आणि विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने लंकेच्या फिरकी गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आणखी एक दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने 20 षटकात 8 बाद 112 धावा जमवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 15.5 षटकात बिनबाद 113 धावा जमवत एकतर्फी विजय नोंदवला.
लंकेच्या डावामध्ये सलामीच्या समरविक्रमाने 40 चेंडूत 3 चौकारासह 34, कर्णधार अट्टापटूने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 16, गुणरत्नेने 33 चेंडूत 1 चौकारासह 24, निलाक्षी डिसिल्वाने 7 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 15 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मेगान स्कूट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 24 धावात 4 तर ग्रेस हॅरीसने 7 धावात 2 तसेच इलेसी पेरी आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेने 10 षटकाअखेर 1 बाद 56 धावा जमवल्या होत्या. पण त्यानंतर उर्वरित 10 षटकात त्यांनी आणखी 7 गडी गमावताना 56 धावांची भर घातली. लंकेच्या डावातील शेवटच्या षटकात स्कूटने 3 गडी बाद केले. तिने या षटकात अॅमा कांचनाला 4 धावावर तर त्यानंतर माळसा शेहानीला शून्यावर आणि सुगंधिका कुमारीला 4 धावावर बाद केले. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अॅलिसा हिली आणि बेथ मुनी या सलामीच्या जोडीने 15.5 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठले. हिलीने 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह नाबाद 54 तर बेथ मुनीने 53 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 56 धावा झळकवल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकार नेंदवले गेले. या जोडीने 7.4 षटकात अर्धशतकी भागीदारी नोंदवली तर त्यानंतर या जोडीने 14 व्या षटकात शतकी भागीदारी झळकवली. हिलीने 38 चेंडूत आपले अर्धशतक झळकवताना अट्टापटूच्या फ्री हिट चेंडूवर स्वीपचा चौकार ठोकला. मुनीने 50 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात यष्टीरक्षक सलामीची फलंदाज अॅलिसा हिलीने नाबाद अर्धशतक तसेच यष्टीरक्षण करताना तीन खेळाडूंना यष्टीचित केल्याने तिची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात 8 बाद 112 (समरविक्रमा 34, अट्टापटू 16, गुणरत्ने 24, डिसिल्वा नाबाद 15, स्कूट 4-24, हॅरीस 2-7, पेरी 1-14, वेरहॅम1-20), ऑस्ट्रेलिया 15.5 षटकात बिनबाद 113 (अॅलिसा हिली नाबाद 54, बेथ मुनी नाबाद 56).
आजचे सामने
इंग्लंड वि. भारत (सामन्याची वेळ 6.30 वाजता)
द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया