चौथ्या सामन्यात भारताचा सात धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ मुंबई
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताविरुद्ध 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली. या मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गार्डनरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 188 धावा जमवल्या. त्यानंतर भारताने 20 षटकात 5 बाद 181 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 7 धावांनी गमवावा लागला. या पराभवामुळे भारताचे मालिकेतील आव्हानही संपुष्टात आले. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या मंगळवारी खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावात इलेसी पेरीने 42 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 72, कर्णधार हिलीने 21 चेंडूत 6 चौकारासह 30, गार्डनरने 27 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 42, हॅरीसने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 27, मॅकग्राने 1 चौकारासह 9 तर मुनीने 2 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 8 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले. दुखापतीमुळे हिलीला निवृत्त व्हावे लागले. गार्डनर आणि पेरी यांनी तिसऱया गडय़ासाठी 94 धावांची भागीदारी केली तर त्यानंतर पेरीने हॅरीस समवेत अभेद्य 48 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे दीप्ती शर्माने 2 तर राधा यादवने एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 9 षटकात 115 धावा झोडपल्या.
भारताच्या डावामध्ये कर्णधार हरमनप्रित कौरने 30 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 46, देविका वैद्यने 26 चेंडूत 3 चौकारासह 32, रिचा घोषने 19 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 40, दीप्ती शर्माने 2 चौकारासह नाबाद 12, स्मृती मंदानाने 3 चौकारासह 16, शेफाली वर्माने 4 चौकारासह 20 आणि रॉड्रीग्जने 1 चौकारासह 8 धावा जमवल्या. भारताच्या डावात 3 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले. या मालिकेतील गेल्या दोन सामन्यात मंदानाची फलंदाजी म्हणावी तशी दर्जेदार होऊ शकली नाही. तिला अधिक धावा जमवता आल्या नाहीत. भारताला शेवटच्या विजयासाठी 20 धावांची जरुरी होती. ऑस्ट्रेलियाच्या स्कूटने हे षटक टाकले पण तिने या षटकात केवळ 12 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 20 षटकात 3 बाद 188 (इलेसी पेरी नाबाद 72, हॅरीस नाबाद 27, ऍलिसा हिली दुखापतीने निवृत्त 30, मुनी 2, मॅकग्रा 9, गार्डनर 42, दीप्ती शर्मा 2-35, यादव 1-26), भारत 20 षटकात 5 बाद 182 (मंदाना 16, शेफाली वर्मा 20, रॉड्रीग्ज 8, हरमनप्रित कौर 46, देविका वैद्य 32, रिचा घोष नाबाद 40, दीप्ती शर्मा नाबाद 12, गार्डनर 2-20, किंग 2-23, ब्राऊन 1-33).