वृत्तसंस्था/ ऍडलेड
पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील शनिवारी झालेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी खेळविला जाईल.
या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर भारताने तिसरा सामना जिंकून आपले आव्हान जिवंत ठेवले होते. पण शनिवारच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात आले आहे. चौथ्या सामन्यात 25 व्या मिनिटाला दिलप्रित सिंगने भारताचे खाते उघडले. त्यानंतर 29 व्या मिनिटाला जेरेमी हेवर्डने ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. जॅक व्हिटॉनने 30 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल केला. ऑस्ट्रेलियन संघाने 50 सेकंदाच्या कालावधीत 2 गोल नोंदविले. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या 34 व्या मिनिटाला टॉम विकहॅमने ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोल केला. जेरेमी हेवर्डने 41 व्या मिनिटाला संघाचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. 54 व्या मिनिटाला मॅट डॉसनने ऑस्ट्रेलियाचा पाचवा गोल नोंदवून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात भारतीय संघाने गोल करण्याच्या अनेक संधी तसेच पेनल्टी कॉर्नर गमविले. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक आणि वेगवान खेळासमोर भारताची बचावफळी पूर्णपणे कोलमडल्याने त्यांना मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागे. कर्णधार हरमनप्रित सिंग तसेच आघाडी फळीतील भारतीय हॉकीपटूंना ऑस्ट्रेलियाची बचावफळी शेवटपर्यंत भेदता आली नाही.