इंग्लंडचा दुसऱया सामन्यात 72 धावांनी पराभव, स्टीव्ह स्मिथचा 14 हजार धावांचा टप्पा
वृत्तसंस्था/ सिडनी
स्टीव्ह स्मिथच्या शानदार खेळीच्या जोरावर शनिवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 72 धावांनी दणदणीत पराभव करून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले होते.
दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 280 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 38.5 षटकात 208 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्टार्क याने भेदक गोलंदाजी करत 4 गडी बाद केले. तर फिरकी गोलंदाज झम्पाने 4 बळी मिळवित संघाच्या विजयाला हातभार लावला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीचे दोन फलंदाज 43 धावात बाद झाल्यानंतर स्मिथ आणि लाबुसिंगे यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 101 धावांची भागीदारी केली. मोईन अलीने सलामीच्या वॉर्नरला 16 धावांवर बाद केल्यानंतर ओक्सने हेडला 19 धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. लाबुसिंगेने 55 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावांचे योगदान दिले. ऍलेक्स कॅरे रशिदच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. स्टीव्ह स्मिथने 114 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 94 धावा झळकविल्या. अदिल रशिदने त्याला सॉल्टकडे झेल देण्यास भाग पाडले. स्टीव्ह स्मिथ पाचव्या गडय़ाच्या रूपात आणि डावातील 44 व्या षटकात बाद झाला. मिचेल मार्शने 59 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 50 धावा जमविल्या. स्टोनिसने 1 षटकारासह 13 तर ऍग्येरने 1 षटकारासह नाबाद 18 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 6 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे रशिदने 57 धावात 3, ओक्सने 42 धावात 2, विलीने 44 धावात 2 तर मोईन अलीने 24 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 38.5 षटकात 208 धावात आटोपला. इंग्लंडच्या डावात व्हिन्से आणि बिलिंग्ज यांनी अर्धशतके झळकविली. डावातील पहिल्या षटकातील दुसऱयाच चेंडूवर सलामीचा रॉय खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. त्यानंतर स्टार्कने डेव्हिड मलानचा शून्यावर त्रिफळा उडविला. पहिल्या षटकातच इंग्लंडचे हे दोन फलंदाज बाद झाल्याने त्यांना नंतर डाव सावरता आला नाही. सॉल्टने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. व्हिन्से आणि बिलिंग्ज यांनी चौथ्या गडय़ासाठी 122 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडचे बाकीचे फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार मोईन अलीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 10 धावा तर डॉसनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात पाच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. इंग्लंडच्या डावात 7 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. ऑस्टेलियातर्फे स्टार्कने 47 धावात 4, झम्पाने 45 धावात 4 तर हॅझलवूडने 33 धावात 2 गडी बाद केले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मेलबोर्नमध्ये मंगळवारी खेळविला जाणार आहे.
स्टीव्ह स्मिथच्या 14 हजार धावा
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. क्रिकेट क्षेत्रात हा टप्पा कमी कालावधीत ओलांडणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या सिडनीत झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात त्याने 14 हजार धावांचा टप्पा गाठला. स्मिथने या सामन्यात 114 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 94 धावांचे योगदान दिले. त्याने या सामन्यामध्ये 82.45 धावांचा स्ट्राईकरेट राखला. स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 288 सामन्यात तसेच 328 डावात 14 हजार 65 धावा जमविल्या असून त्याने 49.52 धावांची सरासरी राखली आहे. या कामगिरीमध्ये 40 शतके आणि 69 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये त्याने फलंदाजीत 65.44 धावांचा स्ट्राईकरेट नोंदविला आहे. त्याने 239 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली आहे. स्टीव्ह स्मिथने आपल्याच देशाच्या डेव्हिड बूनचा विक्रम मागे टाकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ हा नववा फलंदाज आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 27 हजार 368 धावा, स्टीव्ह वॉने 18 हजार 496, ऍलन बोर्डरने 17 हजार 698, मिचेल क्लार्कने 17 हजार 112, डेव्हिड वॉर्नरने 16 हजार 612 धावा नोंदविल्या आहेत. भारतातर्फे सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34 हजार 357 धावांचा विक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे. लंकेचा संगकारा 28 हजार 16 धावांसह दुसऱया, पाँटिंग 27 हजार 483 धावांसह तिसऱया, लंकेचा महेला जयवर्धने 25 हजार 957 धावांसह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक्विस कॅलिस 25 हजार 534 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 50 षटकात 8 बाद 280 (स्टीव्ह स्मिथ 94, लाबुसिंगे 58, मिचेल मार्श 50, हेड 19, अदिल रशिद 3-57, ओक्स 2-42, विली 2-44, मोईन अली 1-24), इंग्लंड 38.5 षटकात सर्वबाद 208 (बिलिंग्ज 71, व्हिन्से 60, सॉल्ट 23, डॉसन 20, स्टार्क 4-47, झम्पा 4-45, हॅझलवूड 2-33).