सामनावीर कॅमेरॉन ग्रीन ः 92 चेंडूत नाबाद 89 धावा
वृत्तसंस्था/ केर्न्स
‘सामनावीर’ कॅमेरॉन ग्रीन आणि ऍलेक्स कॅरे यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर मंगळवारी येथे झालेल्या पहिल्या दिवस-रात्रीच्या वनडे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दोन गडय़ांनी पराभव केला.
मंगळवारच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 9 बाद 232 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 233 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 45 षटकात 8 बाद 233 धावा जमवित विजय नोंदविला. या दिवस-रात्रीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीनचे नाबाद अर्धशतक तसेच कॅरेचे अर्धशतक आणि गोलंदाजीत मॅक्सवेल व हॅजलवूड यांची प्रभावी कामगिरी ही वैशिष्टय़े ठरली.
न्यूझीलंडच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही. त्यांच्या तीन फलंदाजांनी 40 धावांचा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. डावातील पाचव्या षटकात स्टार्कने सलामीच्या गप्टीलला 6 धावावर झेलबाद केले. कॉनवे आणि कर्णधार विल्यम्सन यांनी दुसऱया गडय़ासाठी 81 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंड संघाला धावांची गती वाढविणे अवघड गेले. कॉनवेने 68 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 46 तर विल्यम्सनने 71 चेंडूत 1 षटकार 3 चौकारासह 45, लॅथमने 57 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 43, मिचेलने 2 चौकारासह 26, नीशमने 1 षटकारासह 16, सँटनरने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. ग्लेन मॅक्सवेलने 52 धावात 4, हॅजलवूडने 31 धावात 3, स्टार्क, झाम्पा यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचा निम्मा संघ केवळ 44 धावात तंबूत परतला होता. त्यानंतर कॅरे आणि ग्रीन या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 158 धावांची भागीदारी केली. सलामीचा वॉर्नर 20 धावावर बाद झाला. कॅरेने 99 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 85 तर ग्रीनने 92 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह नाबाद 89 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्टने 40 धावात 4 तर हेन्री आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 50 षटकात 9 बाद 232 (कॉनवे 46, विल्यम्सन 45, लॅथम 43, मिचेल 26, नीशम 16, सँटनर 13, मॅक्सवेल 4-52, हॅजलवूड 3-31, स्टार्क 1-43, झाम्पा 1-38), ऑस्ट्रेलिया 45 षटकात 8 बाद 233 (कॅमेरुन ग्रीन नाबाद 89, कॅरे 85, वॉर्नर 20, बोल्ट 4-40, हेन्री 2-50, फर्ग्युसन 2-60).