वृत्तसंस्था/ टाऊन्सव्हिले
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील रविवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने झिंबाब्वेचा पाच गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात 33 धावांत पाच गडी बाद करणाऱया ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनला सामनावीर पुरस्कार मिळाला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचा डाव 47.3 षटकात 200 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 33.3 षटकात 5 बाद 201 धावा जमवित विजय नोंदविला. 2004 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात झिम्बाब्वेची ही पहिली वनडे मालिका खेळवली जात आहे.
झिंबाब्वेच्या डावामध्ये मधेवेरेने 91 चेंडूत 4 चौकारासह 72, मेरुमनीने 61 चेंडूत 4 चौकारासह 45, कर्णधार चकबवाने 33 चेंडूत 3 चौकारासह 33, सलामीच्या काइयाने 2 चौकारासह 17 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. झिंबाब्वेच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. मेरुमनी आणि मधेवेरे यांनी दुसऱया गडय़ासाठी 45 धावांची भर घातली. तत्पुर्वी केया आणि मेरुमनी यांनी सलामीच्या गडय़ासाठी 42 धावांची भागीदारी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनने 33 धावात 5, झम्पाने 57 धावात 3 तर स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. वनडे क्रिकेटमध्ये कॅमेरॉनने पहिल्यांदाच 5 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने 66 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 57, स्टिव्ह स्मिथने 80 चेंडूत 6 चौकारासह नाबाद 48, स्टोइनीसने 1 षटकार आणि 2 चौकारासह 19, कॅरेने 2 चौकारासह 10, मॅक्सवेलने 9 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 32 धावा झोडपल्या. फिंच आणि वॉर्नर यांनी सलामीच्या गडय़ासाठी 43 धावांची भागीदारी केली. फिंच बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱया गडय़ासाठी 55 धावांची भर घातली. झिंबाब्वेतर्फे बर्लने 60 धावात 3 तर नॅग्रेव्हा आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 5 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. या मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी याच ठिकाणी खेळवला जाईल. रविवारचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी गेल्या मे महिन्यात वाहन दुर्घटनेत निधन पावलेल्या पावलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू सायमंडस्ला दोन्ही संघातील खेळाडूंनी आदरांजली वाहिली.
संक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे 47.3 षटकात सर्व बाद 200 (मधेवेरे 72, मेरुमनी 45, काइया 17, चकबवा 31, कॅमेरॉन ग्रीन 5-33, झम्पा 3-57, स्टार्क 1-27, मार्श 1-22), ऑस्ट्रेलिया 33.3 षटकात 5 बाद 201 (फिंच 15, वॉर्नर 57, स्टीव्ह स्मिथ नाबाद 48, स्टोइनिस 19, मिचेल मार्श 2, मॅक्सवेल नाबाद 32, बर्ल 3-60, नॅग्रेव्हा 1-26, सिकंदर रझा 1-45).