विंडीजचा 164 धावांनी पराभव, लाबूशेन सामनावीर, लियॉनचे 6 बळी
पर्थ/ वृत्तसंस्था
यजमान ऑस्ट्रेलियाने रविवारी येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत विंडीजचा 164 धावांनी दणदणीत पराभव करुन प्रँक वॉरेल चषक स्वतःकडे राखला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनने 128 धावात 6 गडी बाद केले. पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱया डावात नाबाद शतक झळकाविणाऱया लाबूशेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 4 बाद 598 धावांवर घोषित केला. त्यानंतर विंडीजचा डाव 283 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने 315 धावांची भक्कम आघाडी मिळविली. फॉलोऑन न देताना ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 2 बाद 182 धावांवर घोषित करुन विंडीजला निर्णायक विजयासाठी 498 धावांचे कठीण आव्हान दिले. विंडीजने 3 बाद 192 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. दरम्यान, लियॉनच्या फिरकी गोलंदाजीसमोर उपाहारानंतर विंडीजचा डाव 333 धावांवर आटोपला. कर्णधार ब्रेथवेट आणि मेयर्स यांनी शेवटच्या दिवसातील पहिले सत्र खेळून काढताना 15 षटकात 24 धावा जमविल्या. लियॉनने मेयर्सला स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने 10 धावा जमविल्या. लियॉनने ब्रेथवेटचा त्रिफळा उडविला. त्याने 188 चेंडूत 13 चौकारांसह 110 धावा जमविल्या. ब्रेथवेटचे हे 11 वे कसोटी शतक आहे. हेडने होल्डरला 3 धावांवर बाद केले. हॅजलवूडने डिसिल्वाला झेलबाद केले. त्याने 12 धावा जमविल्या. उपाहारावेळी विंडीजने 7 बाद 257 धावा जमविल्या होत्या. चेस आणि जोसेफ यांनी आठव्या गडय़ासाठी 82 धावांची भागिदारी केली. जोसेफने 3 षटकार आणि 4 चौकारांसह 43 तर चेसने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 55 धावा जमविल्या. हेडने जोसेफचा त्रिफळा उडविला. लियॉनने चेसला स्टार्ककडे झेल देण्यास भाग पाडले. लियॉनने रॉचचा त्रिफळा उडवून विंडीजचा डाव 333 धावांवर समाप्त केला.
ऑस्टेलियाच्या लियॉनने या सामन्यात 128 धावांत 6 गडी बाद केले. त्याने आतापर्यंत 111 कसोटीत एका डावात 21 वेळा 5 पेक्षा अधिक बळी नोंदविले आहेत. हेडने 25 धावात दोन तर स्टार्क आणि हॅजलवूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता उभय संघातील दुसरी कसोटी 8 डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरु होईल. हा कसोटी सामना दिवस-रात्रीचा खेळविला जाणार आहे. 1974 साली ग्रेग चॅपेलने ऑस्ट्रेलियाकडून एका कसोटीत द्विशतक आणि शतक झळकविले होते. त्यानंतर असा पराक्रम लाबूशेनने केला आहे. एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये आपला दरारा राखणाऱया विंडीज संघाला 2003 च्या मे महिन्यानंतर आजपर्यंत झालेल्या 12 कसोटी सामन्यात एकदाही ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेले नाही. 2003 साली लाराच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाने स्टिव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव ः 4 बाद 598 डाव घोषित, विंडीज प. डाव ः सर्वबाद 283, ऑस्ट्रेलिया दु. डाव ः 37 षटकात 2 बाद 182 डाव घोषित, विंडीज दु. डाव ः 110.5 षटकात सर्वबाद 333 (ब्रेथवेट 110, चंद्रपॉल 45, ब्लॅकवूड 24, डिसिल्वा 12, चेस 55, जोसेफ 43, लियॉन 6-128, हेड 2-25, स्टार्क 1-65, हॅजलवूड 1-52).