प्रा. राजा शिरगुप्पे यांचे प्रतिपादन : प्रगतिशीलचे पहिले मराठी साहित्य संमेलन उत्साहात


प्रतिनिधी /बेळगाव
लेखकांनी कोणत्याही साहित्य प्रकारात लेखन केले तरी त्यांचे लेखन समाजाच्या नवनिर्मितीसाठीच आहे, याचे भान बाळगले पाहिजे. खलनायकी प्रवृत्तीमुळे आज आपला भोवताल अधोगतीकडे जात असताना त्याला रोखून हे जग सुरक्षित ठेवण्यासाठी लेखकाने लढणे भाग आहे, असे विचार साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी व्यक्त केले.
लेखकाचे शब्द हे बंदुकीच्या गोळीप्रमाणे आहेत. त्यामुळे ते सांभाळून वापरले पाहिजेत, आणि समाजात बदल घडविले पाहिजेत. लेखकांकडे समाज बदलण्याची मोठी क्षमता आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात लेखकांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, असे विचार आजरा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजा शिरगुप्पे यांनी मांडले.
प्रगतिशील लेखक संघ बेळगाववतीने आयोजित पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ऍड. राजाभाऊ पाटील, डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. आनंद मेणसे, ऍड. नागेश सातेरी, कृष्णा शहापूरकर आदी उपस्थित होते.


भेदभाव न करता विकास आवश्यक
प्रा. राजा शिरगुप्पे पुढे म्हणाले, लेखकांचा प्रत्येक शब्द हा ठिणगी असतो. या ठिणगीच्या जोरावर समाज व्यवस्थेत बदल घडत असतो. समाजात स्त्री-पुरुष भेदभाव न करता विकास झाला पाहिजे. यासाठी महात्मा फुले, आंबेडकर व शाहूंनी विशेष प्रयत्न केले. काळय़ाकुट्ट समाज व्यवस्थेत बदल घडविण्याचे कार्य महात्म्यांनी केले. लेखक झोपला तर सर्व समाज व्यवस्था झोपते, यासाठी लेखकांनी सतत जागरुक आणि उत्साही असले पाहिजे. लेखकाचे साहित्य हे केवळ विनोद निर्मितीसाठी नाही. त्याची लेखणी ही विद्ध्वंस रोखण्यासाठी शस्त्र म्हणून आणि नवनिर्मितीसाठी साधन म्हणून हाताळायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. प्रास्ताविक व स्वागत प्रा. आनंद मेणसे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रेमचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. रोशनी हुंदरे यांनी राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. ऍड. राजाभाऊ पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय चळवळी व रसिकांशिवाय साहित्य पुढे जाणार नाही, असे सांगितले.
भारतातील सद्यस्थिती व लेखकांची जबाबदारी
युगांतरचे संपादक डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, जीवन हे कलांनी समृद्ध असून मानवी जीवनात कला आवश्यक आहे. माणूस कधीही वाईट नसतो, तर परिस्थिती त्याला वाईट बनविते. निसर्गावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे माणसाने निसर्गाशी संबंध कसा जोडावा, याविषयी आता विचार करण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, लेखकाने भविष्याचा वेध घेतला पाहिजे, शिवाय जगात बदल घडविण्याचा विचार झाला पाहिजे, माणुस हा समाजापासून वेगळा राहणे अशक्य आहे. यासाठी प्रथमतः समाजाचा विकास झाला पाहिजे.
तिसरे सत्र
संमेलनाच्या तिसऱया सत्रात प्रा. डॉ. द. तु. पाटील, कॉ. संपत देसाई व कॉ. अनिल आजगावकर यांचा ‘भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात लेखकांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी प्रा. डॉ. द. तु. पाटील म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या काळात लेखकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, काही लेखकांनी राजद्रोह आपल्याला न परवडणारा असल्याने हवे तसे लेखन केले नाही. शिवाय काही मध्यमवर्गीय लेखकांनीही समाधानकारक लेखन केले नाही. 1857 मध्ये देशात बंड पुकारले गेले, ते इंग्रजांनी मोडीत काढले. या काळात फुलेंचे कार्यही महत्त्वाचे होते, असे नमूद केले.
कॉ. संपत देसाई यांनी स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास तपासला गेला तर आपल्याला बुद्धाच्या काळात जावे लागेल. सामाजिक क्रांती घडली तर समाजाचा विकास होतो. शेतकऱयांना पुढे जायचे असल्यास शेतकऱयांच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, यासाठी फुलेंनी विविध प्रयत्न केले. दरम्यान, जातीव्यवस्था गाडून टाकली जावी यासाठी आंबेडकर, फुले व शाहूंनी प्रयत्न केले, असे सांगितले.
कॉ. अनिल आजगावकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या प्रवाहाखाली जे मर्यादित होते, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यानंतर व्यापक स्वरुप प्राप्त झाले. शेतकरी आणि शेतमजुरांचे शोषण व्हायचे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साहित्यातून मांडणी केली. माणसाच्या जगण्यातील जिव्हाळय़ाचे प्रश्न मांडून त्यांनी क्रांतिकारी बदल घडविले, असा मुद्दा मांडला.
सगळीच माणसे परमेश्वराची लेकरे


संमेलनातील चौथ्या सत्रात आजरा येथील प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांचा संत तुकाराम हा एकपात्री प्रयोग झाला. यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांच्या जीवनात आलेली संकटे आणि सुख-दुःखे सादर केली. याबरोबरच तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला हे चित्र रसिकांसमोर ठेवले. सगळीच माणसे परमेश्वराची लेकरे आहेत, असे सांगत प्रयोग सादर केला.