18 जण अद्याप बेपत्ता ः सैन्याकडून बचावकार्य
वृत्तसंस्था / उत्तरकाशी
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले असून ही घटना द्रौपदी का डांडा येथे घडली आहे. या ठिकाणी गिर्यारोहकांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी एका संस्थेचे 28 सदस्य तेथे गेले असताना हिमस्खलन झाले असून यात 10 जणांना जीव गमवावा लागला असून त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप 18 गिर्यारोहक बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरइफ आणि सैन्याने बचावकार्य हाती घेतले आहे. वायुदलाने हिमस्खलनात अडकून पडलेल्या गिर्यारोहकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी 2 चीता हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.
द्रौपदी का डांडा हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 5,006 मीटरच्या उंचीवर आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधून बचावकार्यात वेग आणण्यासाठी सैन्याची मदत मागितली होती, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत उत्तरकाशीमधील हिमस्खलनाची घटना अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. गिर्यारोहकांना वाचण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येत असली तरीही हिमवृष्टीमुळे यात अडथळे निर्माण झाले होते.
23 सप्टेंबर रोजी नेहरू पर्वतारोहण संस्थेच्या 40 गिर्यारोहकांचे पथक उत्तर काशी येथून द्रौपदी का डांडा-2 शिखराच्या दिशेने रवाना झाले होते. याच शिखरावर मंगळवारी हिमस्खलन झाल्याने हे पथक अडकून पडले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच एनआयएमच्या टीमसोबत जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांनी बचावकार्यास सुरुवात केली.