अवतार, द वे ऑफ वॉटर या चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात जगभरात 60 कोटी डॉलर्स, किंवा जवळपास 5 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईत भारतातील 200 कोटी रुपयांच्या प्राप्तीचाही समावेश आहे. हा हॉलिवुडचा चित्रपट असून भारतात सर्वाधिक प्राप्ती करणारा तो दुसऱया क्रमांकाचा चित्रपट ठरला. पहिल्या आठवडय़ात भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवुडचा चित्रपट ऍव्हेंजर्स एंडगेम हा असून त्याची कमाई 260.40 कोटी रुपये होती.
अवतार-2 या चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात अनेक प्रसिद्ध हॉलिवुड चित्रपटांच्या आयुष्यभरातील कमाईलाही मागे टाकले. या अनोख्या चित्रपटाने अल्पावधीतच मिळविलेल्या या यशामुळे चित्रपट तज्ञांनाही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. या चित्रपटाचे एकूण संकलन 193.60 कोटी डॉलर्स इतके झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ऍव्हेंजर्स इनफिनिटी वॉर, स्पायडरमॅन, नो वे होम आणि डॉ. स्टेंज-इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस या चित्रपटांना सहजगत्या मागे टाकले. पण ऍव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाला तो मागे टाकू शकला नाही. भारतातील प्रथम सप्ताहाच्या प्राप्तीत या चित्रपटाच्या पुढे द काश्मीर फाईल्स, ब्रम्हास्त्र आणि दृष्यम 2 हे केवळ तीनच चित्रपट आहेत.
अवतार 2 हा चित्रपट 16 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. भारतात मोजक्याच महानगरांमध्ये तो दाखविण्यात येत आहे. या चित्रपटासाठी 2,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला असून त्याच्या दुप्पटीहून अधिक प्राप्ती त्याने पहिल्याच आठवडय़ात केल्याने तो कदाचित जागतिक विक्रम करु शकेल अशी चर्चा आहे. या चित्रपटाचा पहिला भाग अवतार 1 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागानेही 19 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एकंदर प्राप्ती केली होती. पहिल्या आणि दुसऱया भागाची एकत्र कमाई लक्षात घेतली तर ती आतपर्यंतची कोणत्याही चित्रपटाने केलेली सर्वाधिक प्राप्ती आहे, असे तज्ञांचे मत आहे.