8.23 कोटी रुपये खर्चून अखेर काम पूर्ण : मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन : काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. वाहन चालविण्याचे परवाने मिळविताना द्यावी लागणारी चाचणीही आधुनिक होणार आहे. यासाठीचा ‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक’चे काम पूर्ण झाले आहे. मात्र, मंत्रिमहोदयांमुळे याचे उद्घाटन लांबणीवर पडत आहे. मागील सात-आठ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारे हे ट्रक कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कणबर्गी येथे याची सोय केली आहे. मात्र, उद्घाटनाअभावी बेळगावकरांना याचा फायदा होणे कठीण आहे. चार-पाच वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. सरकारकडून अनुदानही मंजूर झाले होते. अखेर याचे काम पूर्ण झाले आहे.
पोलिसांवरील ताण होणार कमी
ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टमुळे चाचणी घेऊन वाहन परवाना देणाऱया पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. हा ट्रक कणबर्गी येथे मंजूर होऊन काम पूर्ण झाले आहे. या ट्रकच्या खाली सेन्सर आणि कॅमेरे बसविले जातात. यामुळे वाहन चालविण्याची चाचणी घेताना संबंधित अधिकाऱयांना ट्रकवर उपस्थित राहण्याची गरज नाही. संबंधित चाचणीचे लाईव्ह व्हिडीओ किंवा रेकॉर्डेड प्रत ते पाहू शकणार आहेत. ट्रकवर उमेदवार आपले वाहन घेऊन आल्याची माहिती सेन्सरच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱयाला मिळते. वाहन चालविताना उमेदवार कोठे चुकला का याची माहिती संग्रहित करता येणार आहे.
गैरकारभाराला बसणार आळा
या माहितीच्या आधारावर एखाद्याला वाहन परवाना द्यावा की नाही, याचा निर्णय संबंधित अधिकारी घेण्याची मुभा होती. सध्या परवाना मिळविण्यासाठी चाचण्यांना सामोरे जावे लागते. शिकावू आणि कायमचा परवाना मिळविण्यासाठी या चाचण्या घेतल्या जातात. यासाठी शेकडो वाहनचालक दररोज उपस्थित असतात. या प्रत्येकाची चाचणी घेणे अवघड असल्याने काही वेळा गैरकारभार होतात आणि वाहन चालविण्याच्या बाबतीत पूर्णपणे सक्षम नसणाऱयांनाही परवाने मिळतात. यासाठीच ही नवी पद्धत अंमलात आणण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेऊन तो लवकरच अंमलातही आणला. मात्र, तो कधी सुरू होणार याकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण झाले असते तर बेळगाव हे हायटेक वाहन चाचणी केंद्र असणारे राज्यातील दुसरे ठिकाण बनले असते. मात्र, आता उशिराने या कामाला गती मिळाली असून लवकरच हे ट्रक कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पासाठी नियोजित आराखडय़ानुसार 6 कोटींचा खर्च अपेक्षित होता. आता त्यात वाढ होऊन तो 8 कोटी 23 लाखांपर्यंत गेला आहे. ट्रक निर्मिती, आवश्यक तंत्रज्ञान आणि जागेची खरेदी यासाठी हा खर्च आला आहे.
लवकरच नागरिकांच्या सेवेत
ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक बेळगाव शहरासाठी यापूर्वीच मंजूर झाला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रेंगाळले होते. आता कणबर्गी येथे याचे काम सुरू असून लवकरच हे ट्रक नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या चार-पाच महिन्यात हे ट्रक सुरू होईल. या ठिकाणी एक कार्यालय उभारण्यात आले असून काही आरटीओचे कामकाज येथे चालणार असल्याचे बेळगावचे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सांगितले.