प्रतिनिधी /बेळगाव
मतदार याद्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. ज्यांनी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनी आपली नावे मतदारयादीत दाखल करावीत. मतदानाचे महत्त्व ओळखून मतदार याद्यांमध्ये नावे दाखल करावीत, यासाठी ही जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्या हस्ते या जनजागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनजागृती फेरीचे उद्घाटन केले. मतदारांनी तातडीने आपली नावे मतदारयादीत दाखल करावीत, जेणेकरून येणाऱया निवडणुकीमध्ये आपणाला भाग घेता येईल. मतदानाविषयी अधिक जागृती होणे गरजेचे आहे. लोकशाहीने आपणाला अधिकार दिला आहे, त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. तेव्हा ज्यांना 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांनी या मतदार यादीमध्ये नावे नोंदवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठी तरुणांनी मतदार याद्यांमध्ये नावे दाखल करण्यासाठी पुढे यावे, यासाठीच ही जनजागृती करण्यात आली.
या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, कित्तूर चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प परिसरात ही फेरी काढून कॅम्प पोलीस स्थानकासमोर सांगता करण्यात आली. या फेरीत जि. पं. मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपनिर्देशक एम. एम. कांबळे, शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्यासह इतर अधिकाऱयांनी भाग घेतला.