प्रतिनिधी /फोंडा
जागतिक कर्णबधीर दिनाचे औचित्य साधून फोंडा येथील शारदा गंथप्रसारक संस्थेतर्फे कर्णदोष असलेल्या मुलांसाठी ‘स्वरनाद’ या उपक्रमाची जागृती व्हावी यासाठी फोंडा शहरातून जागृती फेरी काढण्यात आली. या जागृती फेरीमध्ये स्वरनादशी संबंधित मुले त्यांचे पालक, संस्थेच्या पदाधिकारी डॉ. पौर्णिमा उसगांवकर, डॉ. नूतन देव, ममता बदामी, मुग्धा बोरकर आदींचा सहभाग होता.
संस्थेच्या पै हाऊस येथील कार्यालयापासून दादा वैद्य चौक, फोंडा पालिका उद्यान या मार्गावरून ही फेरी काढण्यात आली. जागृती फेरीची सांगता संस्थेच्या कार्यालयापाशी झाली. यावेळी बोलताना डॉ. पौर्णिमा उसगांवकर यांनी स्वरनादतर्फे कर्णदोष असलेल्या मुलांसाठी सुरु असलेल्या स्पीच थॅरेपीविषयी माहिती दिली. 2 ते 6 वर्षे या वयोगटातील मुलांना कर्णदोष असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर स्पीच थॅरेपीच्या माध्यमातून उपचार केल्यास ते बोलू शकतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. नूतन देव यांनी स्वरनादच्या माध्यमातून स्पीच थॅरेपी व अन्य उपचार घेतलेली मुले आज व्यवस्थीत बोलतात. आपल्या मुलांमध्ये घडून आलेला हा बदल पाहिल्यानंतर पालकांच्या चेहऱयावर जे समाधान दिसते ते अवर्णनीय आहे, असे सांगितले.