प्रतिनिधी /पणजी
गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या नुकत्यात झालेल्या बैठकीत बीपीएड प्रशिक्षण आणि बीएड या दोन्ही पदव्या समान दर्जाच्या असल्याचे अधिसूचित करण्यात आले आहे.
अखिल गोवा शारीरिक शिक्षक मंडळ आणि शारीरिक शिक्षक संघटना यांनी संयुक्तपणे निवेदन सादर करून सदर दोन्ही पदव्या समान दर्जाच्या म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. तिला अनुसरून विद्यापीठाच्या दि. 25 फेब्रुवारी 22 रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बीपीएड प्रशिक्षण आणि गोवा विद्यापीठ मान्यताप्राप्त बीएड या दोन्ही पदव्या समान दर्जाच्या असल्याचे अधिसूचित करण्यात आले आहे.
शेजारील महाराष्ट्र राज्यात वर्ष 1969 पासूनच सदर दोन्ही पदव्यांना समान दर्जा देण्यात आला आहे. गोव्यात मात्र त्यासंदर्भात अद्याप भेदभाव आणि वेळकाढूपणा सुरू होता. त्यातून अनेक शिक्षकांवर अन्याय केल्यासारखेच होत होते. त्यामुळे गेल्या सुमारे 20 वर्षांपासून शिक्षक मंडळातर्फे सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते. राज्यात सध्यस्थितीत 450 पेक्षा जास्त शारीरिक शिक्षक विविध विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमधून विद्यादान करत आहेत.
आता गोवा विद्यापीठाच्या सदर निर्णयामुळे या सर्व शिक्षकांना न्याय मिळाला असून त्याबद्दल अखिल गोवा शारीरिक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष चेतन कवळेकर यांनी विद्यापीठाचे उपकुलगुरू, निबंधक आणि शैक्षणिक मंडळ सदस्य यांचे आभार व्यक्त केले आहेत.