वृत्तसंस्था /कोईमतूर
येथे सुरू असलेल्या 2022 दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात गुरुवारी खेळाच्या दुसऱया दिवशी बाबा इंद्रजितच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 7 बाद 318 धावा जमवित पश्चिम विभागावर 48 धावांची आघाडी मिळविली आहे.
या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाचा पहिला डाव 96.3 षटकात 270 धावात आटोपला. पश्चिम विभागाच्या डावामध्ये हेत पटेलने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 98 तर सर्फराज खानने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34, श्रेयस अय्यरने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37, जयदेव उनादकटने 4 चौकारांसह नाबाद 47, सेठने 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. दक्षिण विभागातर्फे साईकिशोर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 86 धावात 5 तर बसिल थम्पी आणि स्टिफन यांनी प्रत्येकी 2 व के. गौतमने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पश्चिम विभाग प. डाव- 96.3 षटकात सर्वबाद 270 (हेत पटेल 98, उनादकट नाबाद 47, श्रेयस अय्यर 37, सर्फराज खान 34, सेठ 25, साईकिशोर 5-86, थम्पी 2-42, स्टिफन 2-52, के. गौतम 1-74), दक्षिण विभाग प. डाव- 81 षटकात 7 बाद 318 (बाबा इंद्रजित 118, मनीष पांडे 48, के. गौतम 43, रवि तेजा खेळत आहे 26, कुनूमल 31, हनुमा विहारी 25, उनादकट 3-52, सेठ 3-51, कोटियन 1-110).