‘स्मार्ट रिलॅक्सिंग प्लॅटफॉर्म’ बनतेय बालकांना वरदान : गुळणी, उलटीही थांबणार : डी. वाय. पाटील विद्यापीठातील चार प्राध्यापकांचे संशोधन
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
जन्माला आलेले बाळ रडायला लागल्यानंतर ते का रडतेय हे कळतच नसते. किंवा आईने स्तनपान केल्यानंतर अनेकदा बाळ गुळण्या काढते किंवा उलटया करते. त्यामुळे बाळाची तब्बेत बिघडल्यानंतर आई कायमच अस्वस्थ असते. यावर संशोधन करून डी. वाय. पाटील विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘स्मार्ट रिलॅक्सिंग प्लॅटफार्म’ उपकरण तयार केले आहे. यामध्ये बाळाला झोपवताच बाळाच्या उलटय़ा थांबून बाळ गाढ झोपी जातेय. या संशोधनाला ऑस्ट्रेलियाचे पेटंट मिळाले असून भारताच्या पेटंटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या संशोधनाला स्टार्टअप यात्रेत प्रथम क्रमांकाने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.
बाळ जन्माला आल्यापासून ते बोलेपर्यंत त्याला कोणता त्रास होतोय हे कळत नसते. बऱयाचदा उलटय़ाने बाळ हैरान होते. परिणामी काही केल्या बाळाचे रडणे थांबत नसल्याने संपूर्ण कुटुंब काळजीत असते. याचाच अभ्यास करून डॉ. अभिनंदन पाटील, इंजिनिर सोहिली पाटील, बालरोग तज्ञ डॉ. विजय माळी, स्तनपान विशेषक स्नेहल माळी यांनी एक प्रकल्प हाती घेतला. गेल्या पाच वर्षापासून या प्रकल्पावर संशोधन करून ‘स्मार्ट रिलॅक्सिंग प्लॅटफार्म’ उपकरण तयार केले. हे उपकरण तयार करण्यासाठी कॉटनचे कापड, कॉन्टम बायोलॉजीवर आधारीत विशिष्ट पध्दतीची फ्रेमवर्कचा वापर केला आहे. हे उपकरण 2 फुट लांब, एक फुट उंच आणि 750 ग्रॅम वजनाचे असल्याने कॅरी करण्यास सहज शक्य आहे. यामध्ये जन्मापासून ते दोन वर्षापर्यंतचे बाळ झोपू शकते. याला बेल्ट सिस्टिम असल्याने बाळ खाली पडण्याची भिती नाही. याचा 500 पेक्षा जस्त बालकांवर प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे. भविष्यात आर्टीफिशल इंटिलिजन्सचा वापर करून बाळ रडल्यानंतर आपोआप पाळणा हलणारी सिस्टिम तयार केली जाईल. तसेच 1800 ते 2 हजार रूपयांपर्यंत लोकांना हे उपकरण उपलब्ध करून देण्याचा संशोधकांचा मानस आहे.
मानवाचे गुढ उलघडण्यासाठी कॉन्टम बायोलॉजीचा उपयोग
कॉन्टम बायोलॉजी तंत्रज्ञानाचा मानवाच्या आयुष्याचे गुढ रहस्य उलघडण्यासाठी उपयोग होतो. या तंत्रज्ञानाचा एक अविभाज्य घटक म्हणून ‘स्मार्ट रिलॅक्सिंग प्लॉटफॉर्म’ उपकरण तयार केले आहे. परिणामी बाळाचे रडणे थांबून त्याला आराम देण्यासाठी चांगला उपयोग झाला आहे.
डॉ. अभिनंदन पाटील यांच्या नावावर 36 पेटंट
डी. वाय. पाटील विद्यापीठातील डॉ. अभिनंदन पाटील कॉन्सरतज्ञ आहेत. पीएच. डी. नंतर त्यांनी 13 वर्षे कॅन्सर विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी आतडय़ाच्या कॅन्सरवर सूक्ष्म जीवाणूपासून पावडर तयार केली आहे. स्टार्टअप यात्रेचा 2018 चाही प्रथम पुरस्कार त्यांच्याच संशोधनाला मिळाला आहे. आतापर्यंत त्यांनी 181 कार्यशाळांमध्ये आपले 45 संशोधनपेपर सादर केले असून, संशोधनातून त्यांनी आतापर्यंत 36 पेटंटची कमाई केली आहे. यंदाचा 2022 चा स्टार्टअप प्रथम पुरस्कारही ‘स्मार्ट रिलॅक्सिंग प्लॅटफॉर्म’ उपकरणाला मिळाला आहे.
लहान मुलांना आरामदायी उपकरण
लहान मुलांच्या उलटय़ा थांबून त्यांना आराम मिळावा म्हणून ‘स्मार्ट रिलॅक्सिंग प्लॅटफार्म’ या उपकरणाचा 90 टक्के उपयोग होतोय. हे उपकरण येत्या काही दिवसात बाजारात आणण्याचा मानस आहे. हे संशोधन राज्यात अव्वल ठरेलच पण लहान मुलांना आरामदायी असल्याने चारही संशोधकांना त्याचे समाधान आहे.
डॉ. अभिनंदन पाटील (असोसिएट प्रो., डी. वाय. पाटील विद्यापीठ)