वार्ताहर /उचगाव
उचगाव-कोवाड या मार्गावरील बसुर्ते फाटा ते कर्नाटक-महाराष्ट्र सरहद्दीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. यामुळे वाहनधारकांची मोठी कुचंबना होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी असंख्य प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे.
उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण काम सध्या पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित बसुर्ते फाटा ते कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा संपूर्ण रस्ता उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
सदर रस्ता कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरला मिळतो. कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपासून महाराष्ट्रात जाणारा गडहिंग्लजपर्यंतचा रस्ता महाराष्ट्र शासनाने उत्तम दर्जाचा बनविला आहे. मात्र, अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतराचा कर्नाटकातील रस्ता मात्र खराब झालेला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे मुश्कील झाले असून रस्ता पार करण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागते.
मागील उन्हाळय़ामध्ये या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते. आता चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मार्गावरील पुलाची उंची वाढवा
सदर उचगाव फाटा ते बेकिनकेरे या पट्टय़ामध्ये एक नाला लागतो. या नाल्यावर असलेला पूल सध्या खचलेला असून या पुलानजीक मोठमोठे खड्डे असून खड्डय़ात सतत पाणी साचत असते. अतिपावसामुळे डोंगराळ भागातून येणारा पाण्याचा लोंढा या पुलावरून वाहत असल्याने अनेक वेळा वाहतूक विस्कळीत होते. यासाठी या पुलाची उंची वाढवावी आणि वाहनधारकांची, प्रवाशांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी जनतेने केली आहे.