लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : आज रथोत्सव मिरवणूक-महाप्रसादाचे वितरण
वार्ताहर /किणये
तारिहाळ येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या पावनक्षेत्र बडेकोळ मठाच्या श्रावण यात्रोत्सवाला दि. 26 रोजीपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. आज यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असून शनिवारी रथोत्सव मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
पुणे-बेंगळूर महामार्ग, सुवर्ण विधानसौध झाल्यानंतर, हिरेबागेवाडीच्या आधी 6 कि. मी. वरून बडेकोळ मठाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. बेळगाव, खानापूर, कोल्हापूर व गोवा येथील भाविक या मठाला येतात. मठाचे मुख्य आणि संस्थापक शिवयोगी नागेंद्र स्वामीजी हे आहेत. त्यांची समाधी येथे आहे. नागेंद्र स्वामीजी पूर्वी मठाजवळील औदुंबर झाडाच्या गुहेत राहात होते. त्यानंतर मठ बांधण्यास सुरुवात करण्यात आली.
नागेंद्र स्वामीजींचे नातू यांचेही नाव नागेंद्र स्वामी हेच ठेवण्यात आले. आपला दत्तक पुत्र याला त्यांनी समाधीपूर्वी मी पुन्हा अवतार घेणार, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या नातवाचे नावही नागेंद्र स्वामी असे ठेवण्यात आले आहे.
सध्या या मठाचे मठाधीश आताचे नागेंद्र स्वामी हे आहेत. अलिकडे या मठाचा महिमा वाढत चालला आहे. महाशिवरात्रीला पाच दिवस या मठात यात्रा होते. तसेच नवरात्रोत्सवात दररोज अभिषेक करण्यात येतो. दर अमावस्येला मंदिरात मोठी गर्दी होते.
श्रावण महिन्यात येथे दररोज अभिषेक करण्यात आला. शुक्रवारपासून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजता अभिषेक होणार आहे. सकाळी 11 नंतर पादपूजा होईल. त्यानंतर रथोत्सव मिरवणूक होणार आहे. दुपारनंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी यात्रेची सांगता होणार आहे. सर्वांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे मठाधीश नागेंद्र स्वामी यांनी कळविले आहे.