वृत्तसंस्था/ सुरत
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात तेलंगणाचा टॉप सीडेड बॅडमिंटनपटू बी. साई प्रणित तसेच छत्तीसगडची आकर्षी काश्यप यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या एकेरीत सुवर्णपदके पटकाविली.
विश्व बॅडमिंटन स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या साई प्रणितने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकाच्या मिथुन मंजुनाथचा 21-11, 12-21, 21-16 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत छत्तीसगडच्या टॉप सीडेड आकर्षी काश्यपने महाराष्ट्राच्या मालविका बनसोडचे आव्हान 21-8, 22-20 असे संपुष्टात आणत सुवर्णपदक मिळविले. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात तेलंगणाने आतापर्यंत 3 सुवर्णपदके मिळविली आहेत. तेलंगणाच्या एन. सिक्की रेड्डी आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत सुवर्णपदक मिळविताना कर्नाटकाच्या शिखा गौतम आणि अश्विनी भट्ट यांचा 21-14, 21-11 असा पराभव केला. केरळच्या रविकृष्णा आणि एस. उदयकुमार यांनी पुरुष दुहेरीतील सुवर्णपदक मिळविताना तामिळनाडूच्या हरिहरन आणि रुबेनकुमार यांचा 21-19, 21-19 असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या प्रकारात साई प्रतिक आणि अश्विनी पोनाप्पा या कर्नाटकाच्या जोडीने सुवर्णपदक मिळविताना अंतिम सामन्यात दिल्लीच्या रोहन कपूर व कनिका कंवल यांचा 21-15, 21-13 असा पराभव केला.