वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकॉकमध्ये अलिकडेच झालेल्या थॉमस चषक पुरूषांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया भारतीय बॅडमिंटन संघाला अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे एक कोटी रूपयांचे बक्षीस देण्यात आले.
भारतीय बॅडमिंटन संघाचे बँकॉकमधून येथे आगमन झाल्यानंतर येथील सिटी हॉटेलमध्ये रात्री आयोजिलेल्या समारंभामध्ये भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने एक कोटी रूपयांचे रोख बक्षीस तसेच या संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक वर्गाला 20 लाख रूपयांचे बक्षीस प्रदान केले. बॅडमिंटन फेडरेशनचे अध्यक्ष हिमांता विश्वा शर्मा यांनी या संघाचे खास अभिनंदन केले. या समारंभावेळी फेडरेशनचे सरचिटणीस संजय मिश्रा तसेच प्रमुख राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद उपस्थित होते. 73 वर्षांनंतर भारताने प्रतिष्ठेच्या थॉमस चषक प्रथमच पटकाविताना आतापर्यंत 14 वेळा विजेतेपद मिळविणाऱया बलाढय़ इंडोनेशियाचा पराभव केला होता.