Tarun Bharat

पदक विजेत्या बॅडमिंटनपटूंसाठी बीएआयकडून बक्षिसाची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेत्या बॅडमिंटनपटूंसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने दीड कोटी रुपयांची रोख रकमेची बक्षिसे जाहीर केली आहेत.

अलीकडेच झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी दर्जेदार कामगिरी करताना तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळविली होती. त्याचप्रमाणे 2021 आणि 2022 विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंनी तीन पदके मिळविली आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. या कामगिरीबद्दल अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने त्यांना रोख रकमेची बक्षीसे जाहीर केली आहेत. बर्मिंगहम राष्ट्रकुल  स्पर्धेत भारताचा 10 जणांचा बॅडमिंटन संघ सहभागी झाला होता. या संघातील बॅडमिंटनपटूंना एकूण 30 लाख रुपये (प्रत्येकी 3 लाख रुपये) मिळणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय बॅडमिंटन संघाला मार्गदर्शन करणाऱया 8 सदस्यांच्या चमूला प्रत्येकी दीड लाख रुपये देण्यात येतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळविणाऱया भारताच्या लक्ष्य सेन व पी. व्ही. सिंधू यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच पुरुष दुहेरीतील भारताची विजेती जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. महिलांच्या दुहेरीत कांस्यपदक मिळविणाऱया गायत्री गोपीचंद व त्रीसा जॉली यांना 7.5 लाख रुपये मिळणार आहेत. माजी टॉप सिडेड बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीचे कांस्यपदक मिळविले. तसेच त्याने स्पेनमध्ये 2021 साली झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल त्याला आणखी 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. गेल्या महिन्यात टोकियोत झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत कांस्यपदक मिळविणाऱया चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना आणखी 7.5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असून 2021 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत कांस्यपदक घेतल्याबद्दल लक्ष्य सेनला आणखी 5 लाख रुपये बक्षिसादाखल दिले जाणार आहेत.

Related Stories

जुर्गेन क्लॉप सर्वोत्तम व्यवस्थापक

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून ब्रॅडीची माघार

Patil_p

पाटणा पायरेट्सची तेलुगू टायटन्सवर निसटती मात

Patil_p

दिल्लीला नम वित उत्तर प्रदेश उपांत्य फेरीत

Patil_p

जपान, स्पेन बाद फेरीत दाखल

Patil_p

त्रिपाठी-अय्यरच्या वादळात मुंबई इंडियन्सचा धुव्वा

Amit Kulkarni