पाचवे जेएमएफसी न्यायालयाने दिली मंजुरी : सर्व कार्यकर्ते उपस्थित
प्रतिनिधी / बेळगाव
सर्व परिपत्रके व कागदपत्रे मराठीतून द्यावीत, या मागणीसाठी लोकशाहीमार्गाने म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. मात्र हा मोर्चा विनापरवाना काढला, तसेच कायद्याचे उल्लंघन केले, असा आरोप करत म. ए. समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी म. ए. समितीच्या या सर्वांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 25 ऑक्टोबर 2021 रोजी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी धर्मवीर संभाजी चौक येथे धरणे आंदोलनदेखील छेडले होते. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकामध्ये या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दीपक दळवी, किरण गावडे, शुभम शेळके, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, श्रीकांत मांडेकर, रवी साळुंखे, धनंजय पाटील, मदन बामणे, नेताजी जाधव, परशुराम ऊर्फ बंडू केरवाडकर, हणमंत मजुकर, रामचंद्र कुदेमानीकर, विनायक पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, अनिल हेगडे, माधुरी हेगडे, संदीप मोरे, मल्हारी पावशे, चेतन पाटील, कृष्णा गुरव या सर्वांना जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्यामुळे म. ए. समितीचे सर्व 31 कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. रिचमॅन रिकी यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन पाचवे जेएमएफसी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.